मोठी बातमी: राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ८००० रुपयांची मदत जाहीर

दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल.

Updated: Nov 16, 2019, 05:37 PM IST
मोठी बातमी: राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी ८००० रुपयांची मदत जाहीर title=

मुंबई: परतीच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काहीप्रमाणात दिलासा दिला आहे. राज्यपालांनी शनिवारी शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर ८ हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी ही नुकसान भरपाई मिळेल. तर फळबागा आणि बारमाही पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी १८००० रुपये इतकी नुकसान भरपाई मिळणार असल्याचे राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. याशिवाय, शेतसारा माफ केला जाणार आहे. तसेच ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

कर्जमाफीसोबत शेतीसाठी शून्य किंवा अल्पदरात कर्जाची गरज - शरद पवार

 

मदत केंद्रे उभारा... शेतकऱ्यांच्या बांधावरून पक्षप्रमुखांचे शिवसैनिकांना आदेश

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे राज्यभरातील अनेक भागांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात गेल्याने बळीराजा हवालदिल झाला होता. यानंतर सरकार आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी राज्यभरात दौरे करून शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली होती. यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. मात्र, राज्यपालांकडून केवळ हेक्टरी ८ हजार रुपयांची मदतच जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे यावरून आता पुन्हा राजकारण रंगण्याची शक्यता आहे. यापूर्वी सरकारकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर केली होती. तसेच पंचनामे न झाल्यासही शेतकऱ्यांना मदत मिळेल, असेही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.