मुंबई : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेची गणितं अद्यापही निकाली निघत नसलाताच आता मुंबई आणि ठाण्याच्या महापौरपदी कोण असणार याविषयीच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलेला असतानाच मुंबई आणि ठाण्यात महापौर हा शिवसेनेचाच असल्याचं लक्षवेधी वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
महानगरपालिकेत वेगळी समीकरण दिसू शकतात, असं म्हणत मुंबईत ठाण्यात आणि इतर ठिकाणी ही शिवसेनेचा महापौर दिसणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या राजकीय पटलासोबतच मुंबई महापालिकेतही रणनिती आखली जाण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला मुंबई महापालिकेत भाजपचे ८३, शिवसेनेचे ८४, काँग्रेसचे २९ आणि राष्ट्रवादीचे ८ नगरसेवक आहेत. याच अनुशंगाने आता पुढील आखणी सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड शनिवारी दिल्लीत याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्याची शक्यता आहे. महापौरपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यास उपमहापौरपदासाठी काँग्रेसचा उमेदवार देणार असल्याचीही शक्यता आहे. राज्याच्या सत्तास्थापनेसाठी एकत्र येण्याच्या मार्गावर असणारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष मुंबई महानगरपालिकेतही एकत्र येण्याच्या तयारीत दिसत आहेत. येत्या काळात याविषयीचं चित्र स्पष्ट होणार असून, आता राऊतांच्या वक्तव्याप्रमाणे मुंबई आणि ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेकडून कोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.