मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी म्हणजेच मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर, ते अतिशय नम्र आणि भावनिक, पण फार संयमाने शब्द वापरून बोलत होते. अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या भावना मांडल्या. मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी बोलताना ते म्हणाले, देवेंद्रजी जेव्हा पत्रकार परिषदेत बोलले, असं काही ठरलंच नव्हतं, असा शब्द दिला गेलाच नव्हता, तेव्हा मला असंख्य इंगळ्या डसल्या सारखं झालं. ज्या मातोश्रीत ही चर्चा झाली, जिथे हे ठरलं, त्यानंतर तुम्ही याला खोटं ठरवता, हाच मातोश्रीचा मान सन्मान तुमच्या मनात होता का? असा सवाल आणि खोटं बोलणं आपल्याला किती टोचलं यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं.
मी आता तीन पक्ष एकत्र आले असताना आजही सांगतोय, खोटं मला कधीच चाललं नाही, माझ्या हिंदुत्वात खोटं कधीच खपवलं जाणार नाही, असं स्पष्टपणे उद्धव ठाकरे यांनी जाहीर बैठकीत सांगितलं.
बाळासाहेब मला नेहमी म्हणायचे, उद्धव एखाद्याला शब्द दिला, तर 10 वेळा, 100 वेळा, 10 हजार, 1 लाख वेळेस विचार कर, पण दिलेला शब्द पाळ, प्राण गेला तरी चालेल पण शब्द पाळ, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांना ही खुर्ची मिळाली यात कुणाला काय मिळालं, पण मला अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे अश्रू पुसायचे आहेत. या खुर्चीला अनेक काटे आहेत, खिळे आहेत, पहिला मुख्यमंत्री जातो, तेव्हा 2 खिळे देखील सोडून जातो, पण कितीही खिळे असू द्या, माझ्याकडे असे खिळे ठोकण्यासाठी अनेक हातोडे असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.