मुंबई : कोरोनाचं आव्हान, राज्याची आर्थिक स्थिती आणि महावितास आघाडी सरकारची एकूण कार्यपद्धती या साऱ्याशी संबंधित प्रश्नांची उत्तरं खुद्द uddhav thackeray मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहेत. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रासाठी घेण्यात आलेल्या या मुलाखतीमध्ये राष्ट्रभक्तीपासून ते थेट राज्यातील जनतेपर्यंत सर्वच मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. ज्याची आणखी एक झलक प्रदर्शित करण्यात आली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर अवघ्या काही क्षणांतच लक्ष वेधत आहे. ज्यामध्ये त्यांनी आपण निराशावादी नसल्याचं स्पष्ट वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे.
'महाविकास आघाडी काय म्हणतेय? मी निराशावादी नाही.., मुख्यमंत्री ऊध्दव ठाकरे यांची Unlocked मुलाखत..', असं कॅप्शन देत राऊतांनी या मुलाखतीची झलक सर्वांच्या भेटीला आणली. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री काही सूचक आणि आश्वासक वक्तव्य करताना दिसत आहेत.
'मी स्वत: निराशावादी नाही आणि मी कोणालाही निराशावादी होऊ देणार नाही', असं मुख्यमंत्री म्हणताना दिसत आहेत. धोरणांची अनिश्चितता असल्यास गुंतवणूक येणार नाही, या वक्तव्यावरुन त्यांनी राज्याच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीनंही काही महत्त्वपूर्ण माहितीपर मुद्दे मांडल्याचं म्हटलं जात आहे. महाविकासआघाडी सत्ते आली तेव्हापासून किंबहुना त्याहीआधीपासून राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे म्हणजे संयम अशीच एक प्रतिमा पाहायला मिळाली. त्याविषयीही राऊतांनी विचारताच, तुम्हाला काय हवं ते ठरवा 'संयम' की 'यम'? असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं पाहायला मिळालं.
प्रश्नांचा ओघ, राजकीय डावपेच, राज्याचं मुख्यमंत्रीपद आणि महाविकास आघाडी सरकार अशा अनेक स्तरांवर आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका बजावत दिलेली मुख्यमंत्र्यांची ही मुलाखत आता अनेकांचीच उत्सुकता वाढवत आहे. २५ आणि २६ जुलै रोजी ही मुलाखत प्रसारित करण्यात येणार आहे.