मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावली आहे. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विभागाचा आढावा घेण्यात येणार आहे. यासोबतच मंत्र्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या जाणार आहेत. या बैठकीमध्ये कोरोना आणि लॉकडाऊनबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी काही मंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत.
कोरोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुनश्च हरी ओम म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यात हळू हळू अनलॉक करायला सुरुवात केली. पण कोरोनाचा वाढता प्रभाव बघता अनेक महापालिका क्षेत्रांमध्ये पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊनच्या या निर्णयावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं गेलं. मंत्र्यांना विश्वासात न घेताच हा लॉकडाऊन घेण्यात आल्याची तक्रार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केली. यानंतर शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.