उद्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक, अनेक लोकल फेऱ्या रद्द

सिग्नल, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती यांसह विविध अभियांत्रिकी कामांसाठी उद्या 10 जुलै रोजी रेल्वेने मेगा ब्लॉक घेतलाय. 

Updated: Jul 9, 2022, 09:21 PM IST
 उद्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक, अनेक लोकल फेऱ्या रद्द  title=

मुंबई : सिग्नल, ओव्हरहेड वायरची दुरुस्ती यांसह विविध अभियांत्रिकी कामांसाठी उद्या 10 जुलै रोजी रेल्वेने मेगा ब्लॉक घेतलाय. त्यामुळे लोकल प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारी घराबाहेर पडणाऱ्या नागरीकांनी रेल्वेचा हा मेगाब्लॉक एकदा पाहून घ्या.   

 मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक 
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे लोकल फेऱ्यांना विलंब होईल. 

हार्बरवर ब्लॉक
हार्बरवर पनवेल-वाशी दरम्यान मार्गांवरही ब्लॉक असेल. हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून फक्त विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. 

पश्चिम रेल्वे
पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांची या ब्लॉकपासून सुटका असणार आहे. कारण पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी कोणत्याही प्रकारचा ब्लॉग घेण्यात आला नाहीए. 

अशा धावतील लोकल 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.32 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील. शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड येथे थांबून मुलुंडहून पुन्हा धीम्या मार्गावर गाड्या धावतील. या सेवा नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने प्लॅफॉर्मवर पोहोचतील. 

ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59  वाजेपर्यंत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे लोकल थांबतील.

सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल 

हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल, बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील. 

पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 कालावधीत डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. 

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-वाशी दरम्यान विशेष लोकल, तर ठाणे-वाशी, नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बरवरील, याशिवाय बेलापूर,नेरुळ-खारकोपर लोकलही सुरू राहतील.