'सलमान खानच्या जवळचे होते म्हणून त्यांची हत्या झाली!' चार्जशीटमध्ये मुंबई पोलिसांनी काय-काय म्हटलंय?

Baba Siddique Murder Salman Khan Connection: बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Pravin Dabholkar | Updated: Jan 6, 2025, 08:01 PM IST
'सलमान खानच्या जवळचे होते म्हणून त्यांची हत्या झाली!' चार्जशीटमध्ये मुंबई पोलिसांनी काय-काय म्हटलंय? title=
बाबा सिद्दीकी

Baba Siddique Murder Salman Khan Connection: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई गॅंगने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती. या हत्येप्रकरणी मुंबई पोलीस चहुबाजूने तपास करत आहेत. दररोज यासंदर्भात नवनवीन माहिती समोर येत आहे. आता याप्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या हत्येप्रकरणी आता सलमान खान कनेक्शन समोर आले आहे. यबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ गँगस्टर अनमोल बिश्नोई याने भीतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी संघटित गुन्हेगारी सिंडिकेटच्या माध्यमातून ही हत्या घडवून आणल्याचे मुंबई पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी एकूण 4 हजार 590 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात 29 जणांना आरोपी करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्या 26 आरोपींसोबत अनमोल बिश्नोईसह तीन आरोपींचाही यात समावेश आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, अनमोल बिश्नोईने भीती आणि वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने सिद्दीकी यांच्या हत्येचा कट रचला.

सिद्दीकी हत्येप्रकरणी 26 जणांना अटक 

अनमोल बिश्नोई व्यतिरिक्त मोहम्मद यासीन अख्तर आणि शुभम लोणकर या आरोपींचा शोध सुरु आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांना अटक केली असून त्यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (एमसीओसी) कायद्यान्वये कठोर कारवाई केली आहे. सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते 66 वर्षीय सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईतील वांद्रे भागात हत्या करण्यात आली. हत्या झाली त्यावेळी ते त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर  होते. अचानक आलेल्या तीन हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडल्या.