Santosh Deshmukh Murder Case Dhananjay Munde Meets Ajit Pawar : सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात विरोधाकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. सर्वपक्षीय नेत्यांचे शिष्टमंडळ यांनी राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशा मागणीचे निवेदन दिलंय. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तडकाफडकी अजित पवारांची भेट घेतली. तब्बल एक तास ही भेट झाली. त्यामुळे या भेटीत नेमकं काय बोलणं झालं यावर खुद्द बैठकीनंतर बाहेर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना सांगितलं.
दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस यांनी सांगितलं की, ते मंगळवारी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहे. मुडें यांनी राजीनामा द्यावा म्हणून बीड, परभणी आणि पुण्यामध्ये मोर्चेही काढण्यात आले.
संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड, विष्णू चाटे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलंय. खंडणीच्या गुन्ह्यात विष्णू चाटेला 10 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची बैठक झाल्यानंतर मुंडे बाहेर आल्यावर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला. तुम्ही राजीनामा देणार का, दादांशी कोणत्या विषयावर चर्चा झाली असं विचारण्यात आल्यावर ते म्हणाले की, मी माझ्या विभागातील कामांसंदर्भात अजित पवार यांची भेट घेतली. आपण फक्त नवीन वर्षांच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. तर कोणत्याही विषयावर चर्चा झालेली नाही. तर संतोष देशमुख प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे मी त्यावर बोलणं योग्य नाही, असं ते म्हणाले. ऑन SIT मधून अधिकारी काढले, तोच फॉर्म्युला तुम्हाला लागू ? हे तुम्हाला योग्य वाटतं का? हे सगळं मीडिया ट्रायल सुरू आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान बैठकीत काय झालं याबद्दल विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे यांनी बीड प्रकरणातील अजित पवारांसमोर आपली बाजू मांडली. त्यासोबत विरोधकांनी केलेल्या आरोपावर मुंडेंनी अजित पवारांसमोर खुलासा केला. सर्व घटनाक्रमाशी आपला संबंध नसल्याचे मुंडे यांनी अजित पवारांना सांगितलंय. दरम्यान आता अजित पवार मुंडेंच्या स्पष्टीकरणानंतर काय भूमिका घेणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलंय.