मुंबई: भाजपकडून विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे धक्का बसलेल्या विनोद तावडे यांच्या जखमेवर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मीठ चोळले आहे. काही दिवसांपूर्वी विनोद तावडे यांनी काँग्रसचे पानिपत झाल्यानंतर अशोक चव्हाण यांनी निवडणूक लढवू नये, असे म्हटले होते. अशोक चव्हाण यांनी शुक्रवारी त्याची सव्याज परतफेड केली.
अशोक चव्हाण यांनी ट्विट करून विनोद तावडे यांना चिमटा काढला. या ट्विटमध्ये अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे की, मी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे. एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे.
त्यामुळे आता तावडे या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतर तावडे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी सर्व प्रयत्न केले. परंतु, त्यांचे हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.
भाजपाकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्ता कट
दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर तावडे यांनी सामोपचाराची भूमिका घेतली आहे. नेमकं काय झालं हे मला जाणून घ्यायचे आहे. कोणी काही बोलल्याने मत झालं असेल तर ती गोष्ट मला कळाली पाहिजे. पक्षनेतृत्त्वाचा राग असल्यामुळे किंवा गटातटाच्या राजकारणामुळे माझे तिकीट कापले, असे मला वाटत नाही.
मुलीसाठी बापानं सोडलं उमेदवारीवर पाणी, 'नाराज' खडसेंचा सूर नरमला
परंतु, या सर्वाचा निवडणुकीच्या प्रचारावर कोणताही परिणाम होणार नाही. निवडणुकीनंतर पक्षाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडेन, असे विनोद तावडे यांनी सांगितले.
मी निवडणूक लढवू नये, असा अनाहूत सल्ला देणार्या विनोद तावडेंना भाजपचं तिकिटही मिळू नये, हा नियतीचा अजब खेळ आहे.
एक मित्र म्हणून मला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे.— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 4, 2019