मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने अस्वस्थ होऊन राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण २२ तासांनी देताना अजित पवार भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. यापुढंही शरद पवारांच्या आदेशानुसार काम करणार, असल्याची ग्वाही अजितदादांनी दिली. अचानक राजीनामा देऊन खळबळ उडवून देणारे अजित पवार यांचा नवाच अवतार शनिवारी अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. परखड, स्पष्टवक्ते अजित पवार चक्क भावुक झाले. त्यांच्या डोळ्यातलं पाणी पहिल्यांदाच सगळ्यांना दिसले.
शुक्रवारी संध्याकाळपासून गायब असलेले अजित पवार शनिवारी दुपारी थेट शरद पवारांच्या मुंबईतल्या सिल्वर ओक निवासस्थानी अवतरले. त्यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीत पवार कुटुंबियांची तब्बल दीड तास बैठक चालली. या बैठकीला सुप्रिया सुळे आणि अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार देखील उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर आधी अजित पवार बाहेर आले आणि त्यानंतर स्वतः शरद पवार आले. ही राजकीय बैठक नव्हती. कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा झाली. चिंतेचं काहीही कारण नाही. काय झालं हे तुम्ही अजित पवारांच्याच मुखातून ऐका, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले.
त्यानंतर अजित पवारांची पत्रकार परिषद झाली. अजित पवारांचा हा इमोशनल अवतार. राजीनामा दिल्यानंतर तब्बल २०-२२ तासांनी अजित पवारांनी आपल्या राजीनाम्याची कारणमीमांसा केली. शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्यानं अस्वस्थ होऊन आपण राजीनामा दिला, हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. बोलता बोलता अजित पवारांचा बांध फुटला. त्यांनी पाण्याची बाटली मागवून घेतली. थरथरत्या हातांनीच ते घटाघटा पाणी प्याले. जीवाभावाचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेल्याचं दुःखही अजित पवारांनी यावेळी बोलून दाखवले.
करारी, परखड आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे अजित पवार. यानिमित्ताने नव्या अजित पवारांची ओळख महाराष्ट्राला झाली. हा सगळा राजकीय पेच सुरू असताना संयमी आणि खंबीर दिसणारे शरद पवार एकीकडे. तर दुसरीकडं इमोशनल झालेले अजित पवार... राष्ट्रवादीच्या दोन प्रमुख नेत्यांची ही बॉडी लँग्वेज. लढायचं की रडायचं, यातलं हे द्वंद उभ्या महाराष्ट्रानं पाहिले.