कल्याण : विधानसभा निवडणुकीसाठी युती होणार हे निश्चित झाल्यानंतर शिवसेना-भाजपला बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातून भाजपचे सध्याचे आमदार नरेंद्र पवार अपक्ष निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे. कल्याण पश्चिममधून शिवसेनेने विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी दिली आहे.
नरेंद्र पवार यांनी आज दुपारी १२ वाजेपर्यंत भाजप नेत्यांना सकारात्मक निर्णय घेण्याबाबत अल्टिमेटम दिला होता. पण याबाबत काहीच निर्णय न झाल्यामुळे नरेंद्र पवार यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. ४ ऑक्टोबरला सकाळी १० वाजता माझा अपक्ष आणि भाजपाचा, असे दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भाजपाने अजुनही कल्याण पश्चिम विधानसभेसाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, असं आवाहन नरेंद्र पवार यांनी केलं आहे.
भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर कल्याण पश्चिमची जागा शिवसेनेच्या वाट्याला आली. २०१४ साली या जागेवर भाजपचे नरेंद्र पवार निवडून आले होते. शिवसेनेला ही जागा गेल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले. कल्याण पश्चिमेतील सर्व भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले.
कल्याण पश्चिम हा बालेकिल्ला असून भाजपच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी करण्याचा उघड उघड इशारा शिवसेनेने दिला होता. सुरुवातीला नरेंद्र पवार यांच्या उमेदवारीला आक्षेप घेणारे भाजपमधील इच्छुक पदाधिकारीही हा मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने नाराज झाले आहेत.