सातारा: साताऱ्याच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर हाडवैरी असणारे रामराजे निंबाळकर आणि उदयनराजे भोसले यांच्यात पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे. उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर शरद पवार यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांसमोर बोलताना उदयनराजे प्रचंड भावूक झाले होते. कॅमेऱ्यासमोर त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता.
एवढेच नव्हे तर शरद पवार साताऱ्यातील पोटनिवडणुकीसाठी उभे राहिले तर मी माघार घेईन, असेही उदयनराजेंनी सांगितले होते.
यावरूनच रामराजे निंबाळकर यांनी बुधवारी साताऱ्यातील सभेत उदयनराजे यांना सणसणीत टोला लगावला. त्यांनी म्हटले की, ऑस्कर पुरस्कार कोणाला द्यायचा झाला तर तो छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळायला हवा. त्यांच्या डोळ्यातील अश्रू बघून माझे यूट्युब चॅनलही रडायला लागले. अगदी धरण फुटल्याप्रमाणे त्यांच्या डोळ्यातून पाणी बाहेर येत होते. त्यांना ऑस्कर नव्हे तर महाऑस्कर दिला पाहिजे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.
छत्रपती उदयनराजे पवारांच्या आठवणीने रडले आणि म्हणाले...
उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडताना खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यासाठी भाजपकडून पुन्हा उदयनराजे यांनाच रिंगणात उतरवण्यात आले आहे. तर राष्ट्रवादीने श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली आहे. भाजप आणि राष्ट्रवादीतील लढाईमुळे ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे.