उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री, संजय राऊतांचा दावा

अजित पवार यांनी राजीनामा दिला असून ते महाविकास आघाडीतसोबत असल्याचे राऊत म्हणाले. 

Updated: Nov 26, 2019, 03:24 PM IST
उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री, संजय राऊतांचा दावा  title=

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील थोड्याच वेळात राजीनामा देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच पुढच्या पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री असतील असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. अजित पवार यांनी राजीनामा दिला असून ते महाविकास आघाडीतसोबत असल्याचे राऊत म्हणाले. 

अजित पवारांशी आमचा संपर्क झाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. अजित पवार यांनी परत यावे यासाठी शरद पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, जयंत पाटील अशा दिग्गज नेत्यांनी त्यांची भेट घेतली. अखेर अजित पवारांची मनधरणी करण्यास राष्ट्रवादीला यश आल्याचे दिसत आहे. 

राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीने केला आहे. तसे संयुक्त पत्र राज्यपाल कार्यालयाला सादर केले आहे. त्याआधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार शनिवारी सकाळी राज्यात आले. मात्र, त्यांच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे त्यांना जास्तवेळ न देता बहुमत चाचणी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या सरकारच्याविरोधात महाविकासआघाडीने सर्वोच्च न्यायालयात गेली. त्यानंतर आज निकाल आला. गुप्त मतदान न करता खुले मतदान घेताना ते चित्रित केले पाहिजे. त्यामुळे महाविकासआघाडीच्या आशा उंचावल्यात. त्यामुळे काही वेळात महाविकासआघाडीचा नेता निवडण्यात येणार आहे. या नेतेपदी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड होण्याची शक्यता आहे.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांच्या महाविकासआघाडीचा नेता आज निवडण्यात येणार आहे. तिन्ही पक्षाच्या आमदारांची महत्वाची बैठक आज  २६ नोव्हेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजता बीकेसीतील ट्रायडेंट हॉटेल येथे  होणार आहे. महाविकास आघाडीचा नेता निवडला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सोफीटेल हॉटेलमध्ये पोहोचले. त्यानंतर, त्यांनी आमदारांशी चर्चा केली. त्याआधी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांशी चर्चा केली. तर काँग्रेसनेही आपला विधिमंडळ नेताही निवडला. बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसने निवड केली. त्यानंतर महाविकासआघाडीकडून राज्यपाल कार्यालयात जाऊन सेवा ज्येष्ठतेनुसार बाळासाहेब थोरात यांना हंगामी अध्यक्ष करण्यात यावी, अशी मागणी केली. त्यामुळे महाविकासआघाडीने सरकार स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी करण्यावर भर दिला.

त्याचाच एक भाग म्हणून महाविकासआघाडीच्या १६२ आमदारांना ग्रँड हयात हॉटेलमध्ये पक्षाशी एकनिष्ठतेची शपथ देण्यात आली. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत तिनही पक्षांच्या आमदारांना शपथ देण्यात आली.  भारतीय संविधानाला साक्ष ठेवून शपथ घेतो की आदरणीय सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी स्थापित केलेल्या आघाडी सोबत प्रामाणिक राहील कुठल्याही प्रलोभणाला बळी पडणार नाही माझ्या हातून भाजपला मदत होईल असे कृत्य करणार नाही, पक्षविरोधी कार्य होणार नाही सर्व नेत्यांनी सांगितलेल्या आदेशाचे पालन होईल, अशी शपथ देण्यात आली. कुठलीही चुकीची गोष्ट खपवून घेणार नाही, हा गोवा नव्हे महाराष्ट्र आहे. असं विधान यावेळी शरद पवारांनी केलं. तर सत्तामेव जयते नव्हे सत्यमेव जयतेसाठी काम करु, असं उद्धव ठाकरे यांवेळी म्हणाले.