Uddhav Thackeray meet Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील राजकारणातील आज सर्वात लक्षवेधी दिवस ठरला. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय झाला. त्यानंतर मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. या सोहळ्यासाठी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र या दोन्ही नेत्यांनी शपथविधीला उपस्थिती लावली नव्हती. पण नागपुरातील हिवाळी अधिवेशात आज उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर सर्वांचा भुवया उंचावल्यात. नागपुरातील मुख्यमंत्री दालनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांची भेट घेतली. बंद दरवाज्या आड दोन्ही नेत्यांमध्ये 6-7 मिनिटं चर्चा झाली.
त्यानंतर उद्घव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. पण नार्वेकरांच्या कार्यालयाकडे जाण्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कार्यालय होतं. पण उद्धव ठाकरे यांनी त्या दिशेला तोंड करुनही पाहिलं नाही. दरम्यान उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात असतानाच, तिथे नेमके शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई आणि आशिष जयस्वालही आले होते. मात्र ते लगेचच अध्यक्षांच्या दालनातून बाहेर पडले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे पत्रकारांशी बोलले. तेव्हा म्हणाले की, महाराष्ट्रात सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा असून ही केवळ सदिच्छा भेट होती. आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकलीय. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या हिताची काम होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आल ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत.
तर आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आम्ही आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आहे. हे ईव्हीएम सरकार आहे, ईव्हीएमवर संशय आहे तो आहे. राजकीय पक्ष म्हणून आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्यात. महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावं राज्याच्या हिताच्या सूचना आम्ही करु.'