दारूऐवजी सॅनिटायझर प्यायल्यामुळे साताऱ्यात दोघांचा मृत्यू

सॅनिटायझर प्यायल्यामुळे साताऱ्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. 

Updated: Apr 28, 2020, 06:05 PM IST
दारूऐवजी सॅनिटायझर प्यायल्यामुळे साताऱ्यात दोघांचा मृत्यू title=

तुषार तपासे, झी मीडिया, सातारा : सॅनिटायझर प्यायल्यामुळे साताऱ्याच्या जिंती गावात दोघांचा मृत्यू झाला आहे. दारू आणि सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल हा घटक असतो, पण दोघांचाही परिणाम भिन्न असल्यामुळे तळीरामांची फसगत झाली आणि ते जीवाला मुकले.

लॉकडाऊनमुळे दारू बंद आहे, तर कोरोनामुळे हॅण्ड सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. हॅण्ड सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असल्यामुळे अनेक तळीरामांनी दारूची तलफ हॅण्ड सॅनिटायझरवरती भागवण्याचा प्रयत्न केला. तामीळनाडूमध्ये हॅण्ड सॅनिटायझर प्यायल्यामुळे तिघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. आता त्याचीच पुनरावृत्ती सातारा जिल्ह्यातल्या जिंती गावात घडली आहे. 

साताऱ्यातल्या दोन तळीरामांनी नशेसाठी हॅण्ड सॅनिटायझरसदृष्य द्रव पिऊन टाकलं. यामुळे अस्वस्थ झालेल्या दोघांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झालाय. या दोघांनी सॅनिटायझरसारखं काही तरी प्राशन केल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. या दोघांच्याही शवविच्छेदनाचे रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं.

सॅनिटायझर आणि दारूमध्ये अल्कोहोल असतं, पण दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. यामुळे सॅनिटायझरचा नशेसाठी वापर करुच नका, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. ५० टक्के अल्कोहोल प्यायल्यानंतर शरिरामध्ये त्याच्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात होते. पोटात दुखणं, रक्तदाब कमी होणं, आणि फुफुसावर केमिकलची रिएक्शन येते, यात बरेच जण दगावतात, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

ज्यांना दारूचं व्यसन आहे, त्यांना दारू सोडवण्यासाठी लॉकडाऊनसारखा उत्तम काळ नाही. यामुळे दारूसारखं व्यसन सोडण्याच्या संधीचं सोनं करा, पण नशेसाठी असे जीवघेणे प्रयोग करू नका.