'एक पुतीन दिल्लीत बसलेत, ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतात' पाहा संजय राऊत काय म्हणाले

संजय राऊत यांनी कोणाची तुलना केली पुतीनशी, पाहा काय म्हणाले

Updated: Mar 23, 2022, 08:25 PM IST
'एक पुतीन दिल्लीत बसलेत, ते आमच्यावर रोज मिसाईल सोडतात' पाहा संजय राऊत काय म्हणाले  title=

नागपूर : राज्यात मविआ नेत्यांवर सुरु असलेल्या ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची थेट रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशीच तुलना केली आहे.

नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला. आमच्या सारखे लोक रोज युद्धाचा अनुभव घेत असतात, दिल्लीमध्ये पुतीन बसले आहेत, आमच्यावर मिसाईल सोडतायत, ईडी असेल, सीबीआय असेल, इन्कम टॅक्स असेल रोज आमच्यावर बॉम्ब टाकतायत, मिसाईल सोडतायत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

त्यातून आम्ही वाचलेले आहोत, महाराष्ट्रावर अशा प्रकारचे हल्ले केले जात आहेत, ज्या राज्यात आपली सत्ता नाही, त्या राज्याशी अधिक सन्मानाने वागलं पाहिजे, हे पंडित नेहरुंकडून शिकायल मिळालं. आपल्या विरोधात बोलणारे, आपल्या विरोधी सूर लावणारे, जे आपल्या विचाराचे नाहीत, त्यांचा अधिक सन्मान करणं ही खऱी लोकशाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

शिवसंपर्क अभियानानिमित्ताने संजय राऊत सध्या नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. या अभियानाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे लक्ष वळवण्यासाठी ईडी कारवाई केली जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. 

मोदी सूडबुद्धीने कारवाई करत नाहीत
यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उत्तर दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कधीच सूडाचं राजकारण करत नाहीत, त्यांच्या राज्यात कोणतीही तपास यंत्रणा कधीही सूडाचं राजकारण करणार नाही असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकार किंवा राज्य सरकार असेल कुणीही चुकीची कारवाई करु नये, योग्य तीच कारवाई झाली पाहिजे आणि मोदींच्या राज्यात चुकीची कारवाई होऊ शकत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.