Jitendra Awhad On Standing Against Walkmik Karad: महाराष्ट्रात सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि अभिनेता सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याचं प्रकरण चर्चेत आहे. या दोन्ही प्रकरणांचा संदर्भ देत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सत्ताधाऱ्यांनी राज्यकर्त्यांना निशाणा केल्याचं दिसत आहे. एकीकडे या प्रकरणांवरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असतानाच शरद पवारांच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या दोन्ही प्रकरणांमधील हल्लेखोरांसंदर्भात आपल्या एका पोस्टमधून सूचक विधान केलं आहे. आव्हाड यांनी हल्लेखोरांना समोर आणलेच पाहिजे असं मत व्यक्त करताना सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यात मूळ टार्गेट त्याचा मुलगा तैमूर होता असा खळबळजनक दावा केला आहे. तसेच या पोस्टमध्ये आव्हाड यांनी वाल्मिक कराडच्या जातीचाही उल्लेख केला आहे.
सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्रीनंतर हल्ल्या झाल्याचं सकाळी बातम्यांमधून समोर आल्यानंतर आव्हाड यांनी या हल्ल्यामागे काही धार्मिक कट्टरतावादी तर नाही ना? अशी शंका उपस्थित केली होती. दरम्यान दुसऱ्याच दिवशी म्हणजेच शुक्रवारी आव्हाड यांनी आणखी एक विधान केलं आहे. "प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरं तर मुलाचाच बळी जाणार होता. मात्र, नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मिडीयाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडले," असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
"तैमूर समाजमाध्यमांमध्ये जगभरात प्रचंड लोकप्रिय झाला. नाव ठेवण्याची आपल्याकडे पूर्वापार पद्धत आहे. ही नावे ठेवताना परंपरा पाहून प्रथेनुसार ठेवली जात होती. त्यामुळेच आपल्याकडे राम, लक्ष्मण, दशरथ अशी पौराणिक नावे आढळून येतात. तैमूर हे नावदेखील पौराणिकच आहे. त्याचा अरेबिक अर्थ आहे, 'लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे, त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा!' त्यातूनच सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव 'तैमूर' असे ठेवले," असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. आव्हाड यांनी, "तैमूरचा अरेबिक अर्थ मी आधीच सांगितला आहे. तेव्हा मी स्पष्ट करतो की, सत्य मांडून लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे," असंही म्हटलं आहे.
दरम्यान या पोस्टला रिप्लाय करताना आव्हाड यांनी आणखी एक पोस्ट लिहिताना सैफ अली खान हल्ला प्रकरण आणि वाल्मिक कराड प्रकरणाचा एकाच वेळी उल्लेख केला आहे. या पोस्टमध्ये आव्हाड यांनी आपली आणि वाल्मिक कराडची जात एक असतानाही त्याच्या विरोधात उभं राहण्याचा निर्णय का घेतला हे सांगितलं आहे. "हल्ला करणारा कुणी ही असो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला उघडा केलाच पाहिजे तो मुसलमान असेल तर त्याच्या विरोधात विचार करा तैमूर तुमचा मुलगा असता तर?" असा सवाल आव्हाड यांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना, "वाल्मिक कराड माझ्या जातीतला पण मी सत्याच्या बाजूने उभा राहिलो. विचार एकच होता, संतोषची बायको माझी बहीण असती तर?" असंही म्हटलं आहे. पोस्टच्या शेवटी, "हे जात धर्माचे खुळ सोडा. सत्याच्या मागे उभे रहा," असं आवाहन आव्हाड यांनी केलं आहे.
शरद पवारांचे निकटवर्तीय असलेल्या आव्हाडांच्या या पोस्टची सध्या चांगलीच चर्चा असून त्यांच्या या भूमिकेवरुन दोन गट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.