Viral Video : हॉटेलमध्ये जाऊन आयत्या जेवणावर ताव मारणं हे अनेकांच्याच आवडीचं काम. तुम्हाला हवा तो पदार्थ, हव्या त्या चवीमध्ये तुमच्यापुढं आणून देणारी कैक पद्धतींची हॉटेलं मागील काही वर्षांमध्ये सुरू झाली असावीत. खास प्रसंग किंवा अगदी काहीच खास नसलं तरीही काही मंडळी हॉटेलची वाट धरतात.
हॉटेलमध्ये गेलं असता तिथं काही गोष्टी अगदी सवयीप्रमाणं टेबलावर आणून ठेवल्या जातात. यामध्ये सुरुवातीला दिलं जाणारं पाणी असो किंवा जेवणासोबत दिला जाणारा लालसर रंगाचा व्हिनेगर मध्ये डुंबलेला, किंवा कधी चिरून दिलेला कांदा, सॅलड, लोणची आणि चटण्या असो.
महत्वाची बाब म्हणजे सहसा ऑर्डर केलेल्य़ा प्रत्येक पदार्थाचा खवैय्यांकडून फडशा पाडला जातो. पण, टेबलावर इथून तिथं घुटमळणारा कांदा आणि चटण्या, लोणची मात्र तिथंच रेंगाळत राहतात. कधीकधी त्यांच्याकडे पाहिलंही जात नाही. मग या गोष्टींचं पुढे काय होतं? याच प्रश्नाचं उत्तर देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.
एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, ‘अमृतसर हवेली’ या लोकप्रिय हॉटेल चेनमधील हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. हॉटेलच्या हैदराबाद शाखेतील या व्हिडीओमध्ये एका ग्राहकाला देण्यात आलेलं कांदा आणि लोणचं तसंच पुढे दुसऱ्या ग्राहकाच्या टेबलवर दिलं जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.
आम्ही फक्त व्हिनेगर असणारे कांदेच इतरांना पुन्हापुन्हा देतो, कोणी म्हणे आम्ही असं करत नाही अशी अजिबातच साधर्म्य नसणारी उत्तरं मिळाल्यानं इथं ग्राहकांचाही संताप अनावर होताना दिसत आहे. महागड्या आणि नामांकित हॉटेलांमध्ये अनेकदा जेवणासाठी मोठी रक्कम मोजली जाते. पण, याच हॉटेलांमध्ये मिळणारं जेवण आणि तिथं असणारे पदार्थ खरंच किती स्वच्छ आणि खाण्यायोग्य असतात हाच प्रश्न आता पुन्हापुन्हा उपस्थित होत आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, नेटकरी हा व्हिडीओ पाहून विचित्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर, 'आता हॉटेलमध्ये जातानाही दोनदा विचार करावा लागणार' अशा प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं?