पुण्यात Instagram स्टेटसवरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान राडा, लोखंडी रॉडने मारहाण

पुण्यात विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. इन्स्टाग्राम स्टेटसवरुन दोन गट आमने-सामने आले होते. पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही गटातील 15 विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

Updated: Jan 25, 2023, 12:20 PM IST
पुण्यात Instagram स्टेटसवरुन विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान राडा, लोखंडी रॉडने मारहाण title=
पुण्यात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत तुफान राडा

पुण्यात विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. उरुळी कांचन येथील पद्मश्री मनीभाई देसाई जुनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. इन्स्टाग्रामवर ठेवण्यात आलेल्या स्टेटसवरून हा राडा झाला. विद्यार्थ्यांनी लोखंडी स्टिक, लाकडी दांडक्यांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 

नेमकं काय झालं?

हाणामारीत सहभागी पद्मश्री मनीभाई देसाई जुनियर कॉलेजचे हे विद्यार्थी बारावीत शिकतात. दोन्ही गटातील फिर्यादी तरुणांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एकमेकांना खिजवणारे स्टेटस ठेवलेले होते. या स्टेटसवरुन दोन्ही गटांमध्ये एकमेकांविरोधात संताप होता. कॉलेजच्या पार्किंगमध्ये त्यांनी एकमेकांना जाब विचारला. यानंतर दोन्ही गटात वाद झाला आणि या वादाचं रुपांतर नंतर हाणामारीत झालं. 

विद्यार्थ्यांनी एकमेकांना लोखंडी स्टिक, लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. मारहाणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण ११ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.