Pune Black Magic : हाडांची राख, घुबडाचे पाय आणि काळे वस्त्र... अघोरी कृत्याला विवाहितेने फोडली अशी वाचा

Pune Black Magic : गेल्या पाच वर्षापासून सुरु असलेल्या या अत्याचाराला महिलेने वाचा फोडल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. महिलेने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे.

Updated: Jan 20, 2023, 12:56 PM IST
Pune Black Magic : हाडांची राख, घुबडाचे पाय आणि काळे वस्त्र... अघोरी कृत्याला विवाहितेने फोडली अशी वाचा title=

Pune Black Magic Crime : दोन दिवसांपूर्वी एका विवाहित महिलेने पोलिसांत दिलेल्या एका तक्रारीनंतर पुणे (Pune News) हादरलं आहे. कुटुंबियांनी  जादूटोणा (Black Magic) आणि अघोरी पूजा करुन छळ करण्यात आल्याची तक्रार सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhgad Police Station) दिली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओखळून तात्काळ गुन्हा दाखल करत महिलेच्या कुटुंबियांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या पाच वर्षापासून सुरु असलेल्या या अत्याचाराला महिलेने वाचा फोडल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. महिलेने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे.

तक्रारदार महिलेकडे लग्न झाल्यापासून पतीसह घरच्यांनी अनेक वेळा पैशांची मागणी केली होती. सासरच्यांनी अनेक वेळा लग्नामध्ये मिळालेले दागिने आणण्यासाठी महिलेकडे मागणी केली आणि त्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. यासोबत घरात भरभराटी व्हावी आणि मुलगा व्हावा यासाठी पतीसह सासू-सासरे, दीर-जाऊ या सगळ्या जणांनी मिळून माझी अघोरी पूजा करत जादूटोण्याचा प्रकार केला होता, असे महिलेने तक्रारीत म्हटले होते. यानंतर पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आणि महत्त्वाच्या बाबी समोर आल्या.

पोलिसांनी या प्रकरणात पतीसह त्याच्या कुटुंबीयांवर विवाहितेचा छळ, नरबळी व अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे. पती जयेश कृष्णा पोकळे, तसेच श्रेयश कृष्णा पोकळे, ईशा श्रेयश पोकळे, प्रभावती कृष्णा पोकळे, कृष्णा विष्णू पोकळे (रा. राधाकृष्ण व्हीला, पोकळे पॅराडाईज, धायरी) दीपक जाधव आणि बबीता उर्फ स्नेहा जाधव (रा. निगडी प्राधिकरण) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये लग्न झाल्यापासून जानेवारी 2023 या कालावधीत हा प्रकार सुरु होता. "माझा आणि जयेशचा विवाह ठरल्यानंतर सासरच्यांनी अनेक गोष्टींची मागणी केली होती. त्यानंतर त्या पूर्ण करण्यात आल्या मात्र विवाहितेचा छळ सुरू झाला. दरम्यान, एकदा महिलेला अमावस्येच्या रात्री घरातील मंडळी काळे कपडे घालत तळघरात काहीतरी करत असल्याचे दिसले. मोबाईलवर एक महिला काहीतरी सांगत होती आणि त्याप्रमाणे कुटुंबिय करत होते. त्यानंतर व्यवसायात भरभराट व्हावी आणि मुलगा होण्यासाठी प्रत्येक अमावस्येला मला सोबत घेऊन अशीच पूजा होऊ लागली," असे तक्रारदार महिलेने सांगितले.

"एकदा अमावस्येच्या रात्री पतीसह सर्व मंडळींनी मला स्मशानभूमीत नेले. तिथे त्यांनी जळालेल्या प्रेताची हाडे त्यांनी जमा केली आणि राखसोबत घेतली. या सर्व वस्तू घरी आणल्या आणि त्यांची पूजा केली. यानंतर ती राख पाण्यात टाकून बळजबरीने मला पिण्यासाठी दिली. जावेच्या निगडी येथील घरी देखील अशीच पूजा असल्याचे सांगून मला तिथे नेण्यात आले. तिथेही अशीच अघोरी पूजा मांडण्यात आली होती. मृताची हाडे, केस, घुबडाचे पाय, कोंबड्याचे मुंडके, असे सर्व त्या ठिकाणी होते. मात्र मांत्रिकाने मला पूजेला बसवले आणि हाडांची पावडर खाण्यासाठी दिली. नकार दिल्यावर मला पिस्तुल दाखवून घाबरवण्यात आले," असेही महिलेने सांगितले.