Sanjay Raut On PM Narendra Modi : महायुती तसेच महाविकास आघाडीत अद्याप लोकसभा जागावाटपाबाबत अद्याप शिक्काकाबोर्तब झालेले नाही. अनेकजण दिग्गज नेते लोकसभा निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातून निवडणूक लढवतील असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
भाजपचे दिग्गज नेते तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे तिकीट कापून पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर किंवा पुण्यातून निवडणूक लढतील असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातून निवडणूक लढवणार असा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी यांचे नाही. यावरुन उद्धव ठाकरे यांनी देखील टीका केली होती. बेहिशोबी संपत्ती गोळा केल्याचा आरोप झालेल्या कृपाशंकर सिंहांचं नाव भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीत आहे. मात्र निष्ठावान गडकरींना पहिल्या यादीत स्थान नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली होती.
निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या राजीनाम्यावरून राऊतांनी भाजपवर हल्लाबोल चढवला. निवडणूक आयोग गेली 10 वर्षे भाजपच्या इशा-यावर काम करतंय असा गंभीर आरोप राऊतांनी केला. निवडणूक आयोग तीन जणांचा असतो आता फक्त गोयल आहेत, एक निवृत्त होत आहेत दुसऱ्यांनी राजीनामा दिला आता उरलेल्या रिकाम्या ज्या दोन जागा आहेत तिथे जसे गव्हर्नर नेमले जातात भाजपचे तसे भाजपचे कार्यकर्ते तिथे नेमले जातील, निवडणूक आयोगाची गरज नाही. निवडणूक आयोग तटस्थ असतो तो संविधानानुसार काम करतो गेल्या दहा वर्षात निवडणूक आयोग भाजपची शाखा असल्यासारखं काम करत आहे. निवडणूक आयोग असला काय आणि नसला काय या देशाला काही फरक पडत नाही अशी टीका संजय राऊत यांनी केली.