Modi Slams Sharad Pawar Rohit Pawar Reply: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा उल्लेख पुण्यातील सभेमध्ये 'भटकती आत्मा' असा केल्यानंतर या प्रकरणावरुन नवीन वाद निर्माण झालेला असतानाच आता एका मुलाखतीत पंतप्रधानांनी पुन्हा एकदा पवारांवर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या कारकिर्दीसंदर्भात बोलतना पंतप्रधांनी शरद पवारांना कुटुंब संभाळता येत नाही तर ते महाराष्ट्र काय संभाळणार? असा सवाल उपस्थित करत टोला लगावला आहे. मात्र मोदींच्या या टीकेला शरद पवारांचे नातू तसेच कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीला पंतप्रधानांनी नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांना शरद पवारांसंदर्भात प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना, मोदींनी, "शरदरावांसंदर्भात बोलायचं झाल्यास त्याची समस्या ही राजकीय नाही. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला हे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना ते कसं पटणार?" असा सवाल उपस्थित केला. पुढे बोलताना मोदींनी, "ही (शरद पवारांसंदर्भातील समस्या) पूर्णपणे त्यांची कौटुंबिक समस्या आहे. हा पूर्णपणे घरातील वाद आहे," असा दावाही मोदींनी केला. "काम करणाऱ्या पुतण्याला वारसा द्यायचा की मुलीला? त्यामुळे सहानुभूतीऐवजी असा प्रश्न पडतो की जे या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही ते महाराष्ट्राला काय संभाळणार?" असा टोला शरद पवारांनी लगावला.
मोदींच्या मुलाखतीमधील हीच क्लिप शेअर करत रोहित पवारांनी मोदींना उत्तर दिलं आहे. "आदरणीय मोदी साहेब, कुटुंब सांभाळण्याची गोष्ट आपल्या तोंडून शोभते का? “लोका सांगे ब्रम्हज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण” अशी तुमची गत आहे," असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. "पत्रकारांना कधीही सामोरे न जाणाऱ्या आपल्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला महाराष्ट्रासाठी एक स्पेशल मुलाखत करावी लागतेय, यावरूनच मराठी स्वाभिमानाचा आणि पवार साहेबांचा आपण किती धसका घेतला, हे आज कळलं," असंही रोहित पवारांनी त्यांच्या 'एक्स' म्हणजेच ट्वीटर पोस्टमध्ये म्हटलं आहे. "असो! पण मराठी माणूस दिल्लीला कशाप्रकारे झुकवू शकतो याचा एक स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून नक्कीच अभिमान आहे," असंही रोहित यांनी पोस्टच्या शेवटी म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी 'भटकती आत्मा' असा उल्लेख करत शरद पवारांवर निशाणा साधला होता तेव्हाही रोहित पवारांनी सोशल मीडियावरुन रिप्लाय दिला होता. संत एकनाथ महाराजांच्या 'काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल! नांदतो केवळ पांडुरंग!' या ओळीचा उल्लेख करत रोहित पवारांनी निशाणा साधला होता. "मोदीजी महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच तुम्हाला महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथं येऊन विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी तुम्हाला अस्थिर आत्मे दिसू लागले. आता 4 जूननंतर भाजप आणि मित्र पक्षांच्या अनेकांना निवांत हिमालयात जाऊन मन स्थिर करण्याची संधी देश देणार आहे. तोपर्यंत काळजी घ्या," असं रोहित पवारांनी म्हटलं होतं.