'सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले' अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

Ajit Pawar : कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार यांनी आपल्याला सांगितल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे. 

राजीव कासले | Updated: Dec 1, 2023, 02:39 PM IST
'सरकारमध्ये जा मी राजीनामा देतो असं शरद पवार म्हणाले' अजित पवार यांचा मोठा गौप्यस्फोट title=

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सरकारमध्ये भाजपसोबत (BJP) जा मी राजीनामा देतो असं शरद पवारच (Sharad Pawar)म्हणाले होते, असा गोप्यस्फोट अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय सर्वांबरोबर चर्चा करुन घेतला. चर्चेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि जयंत पाटीलही होते, असा धक्कादायक गौप्यस्फोटही अजित पवारांनी केला आहे. शरद पवार यांनी आम्हाला गाफिल  का ठेवलं असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. कर्जतच्या चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. 

वायबीसमोरचं आंदोलन ठरवून
मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण बाहेरचं आंदोलनही ठरवून केल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. यशवंत राव चव्हाण सेंटरबाहेर काही महिला, पुरुष हवे आहेत, त्यांनी आंदोलन करायचं असं  सांगण्यात आलं. शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर,  राजीनामा परत घ्या, परत घ्या अशी घोषणाबाजी करण्यात आली, हे काय चाललंय तेच कळत नव्हतं. मला एक सांगतायत, दुसरीकडे वेगळचं चाललंय, नंतर राजीनामा मागे घेण्यात आला. शरद पवारांकडून सांगण्यात आलं, माझ्यानंतर सु्प्रिया सुळे राष्ट्रीय अध्यक्ष असतील, त्याला सर्वांनी तयारी दाखवली, या सर्व गोष्टी ठरलेल्या होत्या असा दावाही अजित पवारांनी केलाय.

2 जुलैला आम्ही शपथ घेतली. हा निर्णय जर आवडला नव्हता, तर 15 दिवसांनी म्हणजे 17 जुलैला आम्हा सर्व मंत्र्यांना चव्हाण प्रतिष्ठानला बोलावून घेतलं. निर्णय आवडला नव्हता तर बोलावलं कशाला. आम्हाला सांगण्यात आलं., पहिल्या दिवशी मंत्री, दुसऱ्या दिवशी सर्व आमदारांनी या. सर्व आमदारांना मी घेऊन गेलो. त्यांच्याकडे जे काही सात-आठ आमदार होते, त्यांच्याशी चर्चा करु आणि पुन्हा सर्व सुरळीत होईल असं आम्हााल सांगण्यात आलं. 

यात खूप वेळ गेला, असं करत शरद पवार यांनी आम्हाला गाफील ठेवलं, असा आरोप अजित पवारांनी केलाय. 12 ऑगस्टला पुण्यात एका उद्योगपतीने आम्हाला जेवायला बोलावलं. निरोप आल्यावर मी गेलो, पण तिथेही काही झालं नाही, असं अजित पवार म्हणाले.

सुप्रिया सुळेंना टोला
मुलांपेक्षा मुलीच जास्त वंशाचा दिवा लावतात, काहींना याचा अनुभव आहे असं सांगत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावलाय. राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात कुटुंब नियोजनाचं महत्व सांगताना अजितदादांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला. यावेळी समान नागरी कायद्याबाबत अनेकांच्या मनात गैरसमज असल्याचंही अजितदादांनी सांगितलंय.