Cororna : कांद्याचे बाजारभाव पुन्हा वाढणार

यामागचं कारण म्हणजे.....  

Updated: Mar 25, 2020, 04:49 PM IST
Cororna : कांद्याचे बाजारभाव पुन्हा वाढणार title=
संग्रहित छायाचित्र

नाशिक : कोरोना Corona विषाणूने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातलेला असतानाच आता याचा परिणाम अन्नाधान्य पुरवठ्यावर होणार, का असाच प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात घर करु लागला आहे. एकिकडे वाशी येशील एपीएमसी मार्केट शनिवारपासून टप्प्याटप्प्याने सुरु होणार असतानाच दुसरीकडे आता अनिश्चित काळासाठी लासलगाव बाजार समितीत कांदा आणि धान्य लिलाव बंद राहणार असल्याची बाब समोर आली आहे.

कोरोनाच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी म्हणून केंद्र सरकारकडून मंगळवारी 21 दिवसांचं देशव्यापी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्यामुळे कोरोनाच्या धास्तीने कामगार वर्गानेच कामावर येण्यास नकार दिल्यामुळे बाजार समितीच्या बैठकीत व्यापाऱ्यांचा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय झाला. 

 

काही दिवसांपूर्वीच कांद्याचे दरांनी मोठी उंची गाठली होती. ज्यानंतर कुठे हे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवड्याच्या टप्प्यावर येतात तोच कोरोनाचं आव्हान साऱ्या जगापुढे उभं राहिलं. त्यामुळे ही एकंदर परिस्थिती पाहता पुढील काही दिवसांसाठी कांदा लिलाव बंद राहणार असल्याने देशांतर्गत कांद्याचा तुटवडा होत त्याच्या बाजार भावात पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.