लाल वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच थांबणार? मुख्यमंत्री शिंदे तोडगा काढणार

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा. मंत्रालयात उद्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक, शेतकऱ्यांचा मोर्चा सुरुच राहणार, संतप्त शेतक-यांनी रस्त्यावर फेकला भाजीपाला

Updated: Mar 13, 2023, 04:02 PM IST
लाल वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच थांबणार? मुख्यमंत्री शिंदे तोडगा काढणार title=

Maharashtra Farmers : राज्यातील शेतकरी सध्या अस्मानी संकटाशी लढतोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने (मार्क्सवादी-Communist Party of India)  पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा पायी मोर्चा (Farmers March) काढण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यापासून (Nashik) या मोर्चाला सुरुवात झाली आहे. माजी आमदार जीवा पांडू गावीत यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दोन वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. पायी प्रवास करत हे लाल वादळ मुंबई विधान भवनावर (Vidhan Bhavan) धडकणार आहे. 

मुख्यमंत्री तोडगा काढणार
दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत तोडगा काढण्यासाठी उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला बोलावण्यात आलंय. उद्या दुपारी 3 वाजता ही बैठक होणार आहे. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन बैठकीचं निमंत्रण दिलंय. राज्य सरकारच्या श्रमिक विरोधी आणि कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणांमुळे शेतीमालाचे भाव कोसळून अक्षरशः कवडीमोल झाल्यानं किसान सभेने आंदोलन पुकारलंय...शेतमालाला हमीभाव मिळावा अशा 14 मागण्या आहेत. सरकारने चर्चेला बोलावलं असलं तरी मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर शेतकरी ठाम आहेत.

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?
कांद्याला 600 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या
कांद्याची नाफेड मार्फत मोठ्या प्रमाणात खरेदी करा
शेतीला लागणारी वीज दिवसा 12 तास उपलब्ध करून द्या
शेतकऱ्यांची थकीत वीज बिले माफ करा
शेतकऱ्यांची शेती विषयक कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा
अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची एन.डी.आर.एफ. मधून तत्काळ भरपाई दया
पीक विमा कंपन्यांच्या लुटमारीला लगाम लावून पीक विमा धारकांना नुकसानीची भरपाई देण्यास कंपन्यांना भाग पाडा.
सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा पिकांचे भाव पाडण्याचे कारस्थान थांबवा.
महामार्ग बाधित शेतकऱ्यांना केरळच्या धर्तीवर मोबदला द्या

भाजीपाला रस्त्यावर फेकून निषेध
नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला रस्त्यावर फेकून निषेध केलाय. शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आणि त्यांनी कांदा, कोथिंबीर, वांगी, टोमॅटो रस्त्यावर फेकला. नाशिकमधून शेतक-यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेनं निघालाय...हा मोर्चा बाजार समितीजवळ आल्यानंतर शेतकऱ्यांनी माल फेकून सरकारचा निषेध केला.

कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याचे पडसाद
दरम्यान, शेतकरी अनेक वर्षांपासून आत्महत्या करत आहेत तो आजचा विषय नाही असं विधान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केलंय. त्यामुळे ते पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. सोयगाव इथं गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना त्यांनी हे विधान केलं. सत्तार यांच्या वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.

शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबेना
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील शेतकरी आत्महत्येचं सत्र थांबताना दिसत नाहीय. सत्तारांच्या मतदारसंघात आज आणखी एका शेतकऱ्यानं जीवनयात्रा संपवलीय. सिल्लोड तालुक्यातल्या बोदवड इथल्या 28 वर्षीय नंदू लाठे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केलीय. नेहमीसारखं शेतात जातो असं सांगून घराबाहेर पडलेला हा तरुण शेतकरी दुपारी जेवण्यासाठी घरी आलाच नसल्यानं नातेवाईकांनी शोधाशोध केली. त्यावेळी नंदू लाठे बेशुद्धावस्थेत आढळून आला. उपचारासाठी सिल्लोड आणि त्यानंतर संभाजीनगरातल्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अजिंठा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.