मुंबई : सध्या राज्यात फक्त दसरा मेळाव्याची चर्चा सुरु आहे. शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. तर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून शिवाजी पार्क या ठिकाणी शिवसेनेचा पारंपारिक दसरा मेळावा पार पडला. यावेळी दोघांनी आरोप- प्रत्यारोप, टीका केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी अनेक कलाकार उपस्थित होते. त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. या दसरा मेळाव्याला लोकप्रिय गायक अवधूत गुप्ते (Avadhoot Gupte) आणि स्वप्नील बांदोडकरने हजेरी लावली.
अवधूत गुप्तेनं यावेळी शिवसेना शिवसेना हे गाणं गायलं. अवधूतचं हे गाणं ऐकल्यानंतर शिवसैनिकांना आनंद झाला. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातही ते हजर होते. यावेळी अवधूतनं लोकनाथ हे गाणं गायलं. दोन्ही कार्यक्रमात अवधूतची हजेरी पाहता तो लवकरच शिंदे गटात जाणार अशा बऱ्याच चर्चा सुरु झाल्या आहेत.
'महाराष्ट्र टाइम्स'ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अवधूत गुप्ते याविषयी बोलताना म्हणाला, 'कलाकार हा फक्त कलाकार असतो. मी याआधी अनेक पक्षांसाठी गाणी गायली आहेत. ती लिहिली आहेत. तसेच संगीतबद्धही केली आहेत. मी खास शिंदे गटासाठी असं काही वेगळं गाणं केलेलं नाही. महेश-चिनार यांनी बनवलेले गाणं मी फक्त सादर केलं. मी शिंदे गटासाठी गाणं गातो याचा अर्थ मी त्या पक्षाचे सदस्यत्व घेतलं, असं होत नाही.'
याशिवाय अवधूतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत अवधूत म्हणाला, 'मी तुमच्या गटाचा ! रसिक मायबाप , BKC वर काल दरऱ्यानिमित्य झालेल्या मेळाव्यात मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेंच्या आमंत्रणानुसार ‘एक गायक म्हणून’ दोन गाणी सादर केली! या पार्शवभूमीवर गैरसमजातून काही प्रसारमाध्यमांनी मी "शिंदे गटात प्रवेश " केल्याच्या बातम्या दिल्या. माझ्याकडे अद्याप कोणत्याही पक्षाचं साधं प्राथमिक सदस्यत्व पण नाही. तसेच मी कोणत्याही पक्षात किंवा गटात प्रवेश केलेला नाही. तुम्ही माझा प्रेक्षकवर्ग, चाहते , फॉलोवर्स हे माझे मायबाप आहात आणि तुम्हाला ह्या गोष्टीच स्पष्टीकरण देणं हे मी माझं उत्तरदायित्व समजतो! मी ह्या आधीही वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरून माझी कला सादर केल्याचे तुम्ही जाणताच! माझ्या लेखी हा विषय इथेच संपला!'
दरम्यान एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याला अनेक कलाकार उपस्थित होते. यात अभिनेता प्रसाद ओक, दिग्दर्शक- लेखक प्रविण तरडे, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, गायक नंदेश उमप यांनी हजेरी लावली. यावेळी शरद पोंक्षे यांनी भाषण केले. तर एकनाथ शिंदेंचे व्यासपीठावर आगमन होताच प्रसाद ओक आणि प्रवीण तरडेंनी उभं राहून टाळ्या वाजवल्या.