Manoj Jarange Patil Slams Fadnavis BJP: मराठा आरक्षणाची मागणी करणारे आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात 2013 च्या एका प्रकरणात अटक वॉरंट जारी करण्यात आल्यानंतर जरांगेंनी यामागे भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप केला आहे. तसेच आपल्याला तुरुंगात टाकून संपवण्याचा कट असल्याचा गंभीर आरोप करताना जरांगेंनी आपण या प्रकरणात निर्दोष असून वेळोवेळी आपण कोर्टात हजर राहिलो आहे. पैसेही भरले आहेत. मग अटक वॉरंट आताच का काढलं? असा प्रश्न करत पोलीस आणि कायदा फडणवीसांच्या हाती असल्याचा उल्लेख जरांगेंनी केली. विशेष म्हणजे जरांगेंनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचंही नाव घेतलं.
2013 मध्ये नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणात मनोज जरांगे-पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला हजर न राहिल्याने जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटक वॉरंट काढले आहे. अटक वॉरंटसंदर्भात जरांगेंना विचारण्यात आलं असता त्यांनी, "अटक करणारच ना! दरेकर यांचं अभियान सुरू आहे. हे कार्यक्रम केले तेव्हा आम्ही मुलं होतो. मराठवाड्यात आम्ही हे नाट्य दाखवण्याची हिम्मत केली. या कार्यक्रमात तोटा झाला. काही जणांनी पैसे चोरले, या कार्यक्रमाचा गल्ला माझ्याकडे नव्हता. या प्रकरणात आम्ही जनजागृतीसाठी प्रामाणिकपणे काम केलं पण तोटा झाला. आम्ही आलेले पैसे ज्याला त्याला वाटून दिले, पण काहींनी पैसे दिले नाही. तरीही हे आमच्या गळ्यात लटकवलं गेले यातील तिसरा शहाणा आहे," असा टोला लगावला.
"हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. सांस्कृतिक मंत्रालय या कार्यक्रमासाठी मदत करू शकत नाही का? बाकी कार्यक्रमासाठी मदत असते का? "अमित शहांचे कार्यक्रमाचे पैसे भरायला सांस्कृतिक मंत्रालय आहे मग या कार्यक्रमाचे पैसे भरायला पैसे नाही का? या खात्याने कुणा कुणाचे पैसे भरले ते खोदून काढतो आता," असं जरांगे म्हणाले. "छत्रपती फक्त निवडणुकीपुरता असतो का फडणवीस साहेब? माझ्या सारख्याला अटक मग निलंगेकर यांना का करता येत नाही? न्यायपालिकेने समान न्याय करावा. माझ्याकडे फसवणूक प्रकरणे शेकडो आहेत. 12 -13 वर्ष हे प्रकरण का उचललं नाही आता का उचललं?" असा प्रश्न राज्याच्या गृहमंत्र्यांचं नाव घेत केला आहे.
नक्की वाचा >> 'टॅक्स, मतांसाठी महाराष्ट्र, निधीत मात्र ठेंगा! शिंदेंनीही...'; बिहारला 37000 कोटी, AP ला 15000 कोटी दिल्याने संताप
"मी मागच्या वेळी न्यायालयाचा सन्मान केला. कोर्टात गेलो. मग आता वॉरंट का काढलं? कोपर्डी प्रकरणात का न्याय दिला नाही? कोर्ट, पोलीस फडणवीस यांच्याकडे आहे, त्यामुळे दरेकर यांचं अभियान फडणवीस करत आहे. विधी आणि न्याय फडणवीस यांच्याकडे आहे. हा त्यांचाच डाव आहे. वॉरंट काढणारा फडणवीस यांचा पाहुणा आहे. तो या प्रकरणात मला आत टाकणार आहे आणि जेलमधील लोक मला खल्लास करणार आहे. फडणवीस तुझी आग मीच शांत करणार आहे. मला काही झालं तर यांच्या जागा निवडून येऊ देऊ नका," असं जरांगेंनी अटक वॉरंटसंदर्भात गंभीर आरोप करताना म्हटलं आहे.
"या प्रकरणात 15-16 वर्ष झाले आताच वॉरंट का यायला लागलेत? कोर्टाने हजर राहून पैसे भरायला रिसतर लावायला पाहिजे होतं पण त्यांनी अटक वॉरंट काढले पाहिजे. कोर्ट म्हणजे हुकूमशहा आहे का? असला फडणवीस यांच्यासारखा विधी आणि न्याय खात्याचा न्याय असतो का आम्ही पेंड आहोत का? कोर्ट चालू देईना. कुणीही आत घेतो, शिंदे, कुटे, निलंगेकर छत्रपती घराण्याला म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन. तुझं मी बरगाडं मोडीन. तुम्ही भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना सगळ्या पक्षातील लोकांना अडचणीत आणता का? अनेक राजकीय नेत्यांना फडणवीस यांनी अडचणीत आणलं. मराठे संपवून तुम्हाला मोठं व्हायचं आहे का?" असा सवाल जरांगेंनी विचारला.
"मराठ्यांच्या ओढाताणीमुळे भाजपला 10 वर्ष मिळाले. निचपणा करून फडणवीस यांना काय मिळणार आहे? पैसे भरायला माझ्याकडे काही नाही. मी जेलमध्ये जायला तयार. माझ्या नावावर फक्त घर आहे. ते तुला लिहून देतो पण घरातही माझं काही नाही. तेही तुला देऊ शकत नाही. माझ्या नावावर एक प्लॉट आहे. तो त्या नाटकावाल्याला लिहून देतो. मी गायराणात राहायला जातो," असंही जरांगे म्हणाले.
नक्की वाचा >> 'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'
जरांगेंनी या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरेंचंही नाव घेतलं. "उद्धव ठाकरेसुद्धा त्याला म्हणाले असतील दे जरांगे मागे खुटूकनं लावून. मी कुठेच अडकत नाही त्यामुळे मला अडकवण्याचा हा डाव आहे. या एफआयआरमध्ये मी 3 नंबरला होतो. फडणवीस यांनी आता मला यात एक नंबरला आणलं आहे. ईडीने अटक केलेले बाहेर निघाले आणि छत्रपतीचा इतिहास दाखवणारे आत टाकणार. फडणवीस म्हणजे देवबाप्पा आहे. हा खुणशी माणूस आहे. हा असा कसा खुणशी आहे. फडणवीस यांचं ऐकून मी वॉरंटला जात नाही. कोर्ट, पोलीस ऐकत असतील तर मी जात नसतो. कोर्टाचं बस झालं आता.
"दरेकर मराठ्यांचा आहे की नाही ते तपासावे लागेल. आता माझ्याविरोधात अभियान सुरू आहे. यांचे लोक मला गोळ्या घालणार आहे. छत्रपती यांचा इतिहास दाखवून मला गोळ्या घालणार असतील तर मी मारायला तयार. फडणवीस मला मरण तुझ्या हाताने येऊ दे. मी तुम्हाला शरण येणार नाही. फडणवीस मी जेलमध्ये जाऊन मारायला तयार आहे. मी आता पैसेही देणार नाही आणि वॉरेटला देखील यायला तयार नाही. माझं घरही दयायला तयार नाही. माझ्याकडे द्यायला आता काही नाही. माझा या प्रकरणात दोष नाही त्यामुळे आम्ही पैसे भरणार नाही," असंही जरांगे म्हणाले.
नक्की वाचा >> 'मोदी सरकारच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस! खोकेशाहीच्या..'; बजेटवरुन ठाकरेंचा घणाघात
"फडणवीस मला यात गुंतवणार आहे. मला आत टाकून याला निवडणूक हाणून न्यायची आहे. मला आत टाकलं तर भाजपचं एकही सीट निवडून येता कामा नये. फडणवीस संपला पाहिजे. कायमचा जात संपवायला निघालेल्या पक्षासोबत राहू नका मराठ्यांनो," असं आवाहन जरागेंनी मराठा समाजाला केलं. "भाजप सोबत राहून भाजपला मोठं करू नका. तुमचं लेकरू म्हणून सांगतो. मी काहीही केलेलं नसताना मला जेलमध्ये जायची वेळ आली आहे. मला उद्या जरी जेलला टाकलं तरी मी तुम्हाला इशारा केला आहे. यांचा सुपडा साफ झाल्यानंतरच माझ्या आत्म्याला शांती लागेल," असंही जरांगे म्हणाले.
"वेळ पडली तर आम्ही आमच्या विचाराचे ओबीसी निवडून आणू. मी दौरा करणार आहे. जोरात तयारी करा. मराठ्यांनी मला उघडं पडू देऊ नये. रॅलीत शक्ती दाखवा. मी सगळ्यांना पायाखाली घेतो. तुम्ही फक्त एकसंघ राहा," असं आवाहनही जरांगेंनी मराठा समाजाला केलं. "शंभुराजे देसाई, शिंदे-फडणवीस यांना पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही मागण्या पूर्ण करा, विधानसभेत आम्ही पाठवणार असलेले आमदार 40-50 आमदार डेंजर असतील 30-40 तर आम्ही पाठवणारच आहोत बाकी काही पाडा पाड्या करू," असा इशाराच जरांगेंनी दिला.
"मी 2 तारखेला हजर होणार नाही. विधानसभेत आपलेही शेर असणार मग मी आता तरी इथे पडून काय करू? तयारीला लागतो इथे पडून राहील म्हणजे ते मग नाटक वाटतं. बाकीच्या जाती सारखे कट्टर मराठे व्हा पक्ष आणि पक्षाच्या नेत्याला बाप मानू नका. त्या वॉरंटमध्ये बदनामी होण्यासारखं काही नाही. मी जेलमध्ये जातो आणि फडणवीसला देखील नेतो. टाक मला आत नाही जात मी एसआयटीमध्ये गुंतलो नाही म्हणून माझ्याविरोधात वॉरंट काढलं आहे," अशा आरोप जरांगेंनी केला.
"हे फडणवीस यांनीच करायला लावलं आहे. त्यांच्या जवळच्या माणसाने मला हे सांगितलं आहे. मला साधी नोटीस देखील आली नही. कायद्याला मानलं पाहिजे म्हणून मी एकदा सुनावणीला गेलो. जामीन घेतला होता. मग जामीन घेऊनही वॉरंट का काढला? आम्ही तिघांचंही काहीही वाईट केलेल नाही. फडणवीस थू तुमच्या जिंदगीवर. आता मराठा तुमच्या पक्षाला मानणार नाही," असंही जरांगे म्हणाले.
"मी वैयक्तिक कुणाच्याही नादाला लागत नही. आम्हाला या प्रकरणात झालेला तोटा आम्ही तिघांनी वाटून घेतला. एकवेळ माझ्या वडिलांच्या नावावर आलेला पीकविमा मी चोरून या तोट्यात भरला. कोणत्याही प्रकरणात गुंतवणे ही फडणवीस यांची परंपरा म्हणून मलाही गुंतवायला लागले फडणवीस यांची ही परंपरा खंडित होता कामा नये," असा टोला जरांगे यांनी लागवला.
शरद पवारांसंदर्भात विचारलं असता जरांगेंनी, "ते भूमिका स्पष्ट करणार नाही. त्यासाठी आमहाला आमचे 30-40 शेर द्यावे लागतील," असं म्हणत निवडणुकीसाठी तयार होत असल्याचे संकेत दिले.