मुंबई : राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गळती लागल्याचं पाहायला मिळतंय. कारण राज्यातील अनेक महत्वाच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेसह भाजपात प्रवेश केलाय. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपातील इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढलं असून ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे.
विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी आता दुसऱ्या पक्षाची वाट धरायला सुरूवात केलीय. राज्यातील अनेक स्थानिक नेत्यांनी आता ठाकरेंची साथ सोडत शिवसेना भाजपात प्रवेश केलाय. नवी मुंबई, पालघर, मुरबाड, धुळे, साक्री, परभणी इथल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. तर पुण्यातील सहा माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत या पदाधिकाऱ्यांनी हातातली ठाकरेंची मशाल बाजूला ठेवत इतर पक्षात पक्षप्रवेश केलाय.
विधानसभा निवडणुकीतील अपयश
स्थानिक पदाधिका-यांशी थेट संपर्क नसणं
पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं जात नसल्याची चर्चा
पालिका निवडणुकांसाठी सत्ताधा-यांना कार्यकर्त्यांची पसंती
दरम्यान सत्ता आणि पैशांचा वापर करून इतर पक्षाच्या लोकांना खरेदी करण्याची वेळ शिंदेंवर आलीये अस म्हणत विनायक राउत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधलाय. तर ठाकरे आणि संजय राऊतांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा आपली अधोगती पाहावी, असं खासदार नरेश म्हस्केंनी म्हंटल आहे.
विधानसभा निवडणुकीतील यशानंतर सध्या युतीतल्या शिवसेना भाजपात पदाधिकाऱ्यांचा ओघ वाढलाय. त्यातच दोन-तीन महिन्यांत राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे सत्ताधार्यांनीही रसद जमवायला सुरुवात केल्याचं बोललं जातंय. ठाकरेंच्या हातून पदाधिकारी निसटून चाललेत. त्यामुळे आता आगामी स्थानिक निवडणुकांसाठी आपले शिलेदारांना पक्षाशी बांधून ठेवण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेसंमोर आहे.