आशिष अम्बाडे / चंद्रपूर : Bhadravati : महाविकास आघाडीच्या मित्र पक्षात फोडाफोडीचा प्रयत्न काँग्रेसने (Congress) केला आहे. याला काही अंशी यश आलेय. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे आयोजित पक्ष मेळाव्यात शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.(Shiv Sena workers have joined the Congress At Bhadravati) शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भद्रावती नगरपालिकेतील सर्व सदस्यांना काँग्रेसमध्ये ओढण्याचा प्रयत्न मात्र ऐनवेळी फसला आहे. या नाट्यात शिवसेनेने बाळू धानोरकर यांना पुन्हा गद्दार म्हटले असून शत्रू-मित्र कोण समजून घ्यावे असा टोला भाजपने लगावला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथे काल काँग्रेसने पक्ष कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. मेळावा पालकमंत्री विजय वडेट्टीवार, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या उपस्थितीत पार पडला. ज्या शहरात हा मेळावा झाला त्या भद्रावती पालिकेवर गेली 25 वर्षे शिवसेनेची सत्ता आहे.
मागच्या लोकसभा निवडणुकीत स्वतः धानोरकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसची उमेदवारी मिळविली आणि ते विजयीही झालेत. खासदार धानोरकर यांच्यावर काँग्रेसचा खाली गेलेला ग्राफ उंचावण्याची जबाबदारी आली. खा. धानोरकर यांनी स्वतःच्या पत्नीला वरोरा-भद्रावती विधानसभेची तिकीट पक्ष दिग्गजांच्या नाराजीनंतर मागून घेतले. प्रतिभा बाळू धानोरकर आमदार झाल्याही, मात्र नंतर कोरोना वाढला आणि काँग्रेसवाढीचे प्रयत्न रखडले होते. आता याला आज मुहूर्त मिळाल्याची चर्चा होती.
ज्या भद्रावती शहरात आजचा मेळावा झाला त्या नगरपरिषदेच्या 28 सदस्य संख्येपैकी शिवसेनेचे सर्व 17 नगरसेवक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत होते. खा. धानोरकर यांचे सख्खे भाऊ अनिल धानोरकर गेली दोन टर्म इथले नगराध्यक्ष आहेत. खासदार धानोरकर यांची संभाव्य दगाबाजी लक्षात घेता ढासळता शिवसेना बालेकिल्ला सावरण्यासाठी शिवसेना नेतृत्व सक्रिय झाली आहे.
शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी भद्रावतीत तळ ठोकला. मविआमधील मित्र पक्षात संघर्ष टाळण्यासाठी भद्रावतीच्या नगरसेवकांचा घाऊक काँग्रेस प्रवेश ऐनवेळी टळला. खासदार बाळू धानोरकर शिवसेनेत असताना ही नगरपालिका सतत एकहाती खेचून आणली होती. आजच्या मेळाव्यात भद्रावती पालिकेतील तीन भाजप नगरसेवकांनी काँग्रेस प्रवेश केला. वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील भाजप-शिवसेना नगरसेवक, बाजार समित्यांचे पदाधिकारी, सरपंच यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे.
याच भागातील दुसरी नगर परिषद असलेल्या वरोरामधील शिवसेनेच्या 9 पैकी 7 नगरसेवकांनी मात्र शिवसेना नेतृत्वाला आव्हान देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवसेना नेतृत्वाने भद्रावती नगरपालिका प्रकरणी आक्षेप घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गाजावाजा करत जाहीर केलेली मेळाव्यातील उपस्थिती टाळली. दरम्यान टीका आणि मविआतील दबाव बघता मवाळ भूमिका घेत काँग्रेस कुठलीही फोडाफोड करत नसल्याचा दावा काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केला आहे.
दरम्यान काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी केलेली ही उठाठेव शिवसेनेच्या वर्मी लागली आहे. शिवसेनेचा गड असलेल्या भद्रावती नगरपालिकेत खिंडार पाडणाऱ्या खासदारांना शिवसेनेने पुन्हा एकदा गद्दार संबोधले आहे. यापुढील सर्व निवडणुकात खासदार बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना खरा शिवसैनिक धडा शिकवेल असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आलाय. पक्षबदलू नगरसेवकांवर शिवसेना कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्याचा राजकीय प्रवास हा कट्टर काँग्रेस ते 90 च्या दशकात भाजप असा झाला आहे. खा. धानोरकर यांच्या विजयानंतर तो पुन्हा काँग्रेसकडे झुकू लागला आहे. एकीकडे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये स्थिरावलेले दिग्गज मंत्री विजय वडेट्टीवार आणि सोबतीला खासदार धानोरकर यांनी काँग्रेससाठी जिल्हा अनुकूल केला आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील चंद्रपूर जिल्ह्यातला बेबनाव भाजपच्या पथ्यावर पडला आहे. दीर्घकाळपर्यंत युतीत असलेल्या शिवसेनेने राज्यात शत्रू कोण मित्र ,कोण समजून घ्यावे असा टोला भाजप नेत्यांनी नव्या बदलात लगावला आहे.
राज्यभर महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष आपापली स्वतंत्र पक्ष रचना करण्यासाठी तयारीत असताना काँग्रेसने मात्र शिवसेनेला जिल्ह्यात संपविण्याचा विडा उचलल्याचे चित्र आहे. आगामी काळात भद्रावती- वरोरा नगरपालिकेतील नगरसेवक पळवापळवीचा हा प्रकार मोठ्या घटनांचे संकेत देणारी ठरेल अशी शक्यता आहे.