उदयनराजेंचा थेट 'छावा'च्या दिग्दर्शकाला फोन; म्हणाले 'जर काही आक्षेपार्ह दाखवलं असेल तर...'

Udyanraje Bhosle on Chhava Film: छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईं लेझीम नृत्य करताना दिसत असून, यामुळे शिवप्रेमी संतापले आहेत. उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी थेट चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करुन सीन हटवण्यास सांगितलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 25, 2025, 07:21 PM IST
उदयनराजेंचा थेट 'छावा'च्या दिग्दर्शकाला फोन; म्हणाले 'जर काही आक्षेपार्ह दाखवलं असेल तर...' title=

Udyanraje Bhosle on Chhava Film: विकी कौशलची (Vicky Kaushal) प्रमुख भूमिका असणाऱ्या 'छावा' (Chhava) चित्रपटाच्या ट्रेलरचं एकीकडे कौतुक होत असताना, एका दृश्यावरुन वाद निर्माण झाला आहे. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाईं लेझीम नृत्य करताना दिसत असून, यामुळे शिवप्रेमी संतापले आहेत. शिवप्रेमी आपला विरोध दर्शवला असताना त्यातच आता उदयनराजे भोसले यांनी यामध्ये उडी घेतली आहे. उदयनराजे भोसले (Udyanraje Bhosle) यांनी थेट चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करुन सीन हटवण्यास सांगितलं आहे. 

उदयनराजे भोसले यांनी छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांना फोन करून चित्रपटात काही आक्षेपार्ह घटना जर दाखवल्या गेल्या असतील तर त्या काढून लोकांपर्यंत चांगला चित्रपट लवकरात लवकर पोहोचवा. तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी देशासाठी, धर्मासाठी केलेले योगदान हे व्यवस्थित चांगल्या पद्धतीने जगासमोर यावे अशी सूचना केली आहे. 

'छावा' चित्रपट रिलीजआधीच वादात, लेझीम नृत्यावरुन वाद; संभाजीराजे छत्रपती म्हणाले 'सिनेमॅटिक लिबर्टीवर...'

 

या चित्रपटांमध्ये दाखवण्यात आलेल्या काही घटना इतिहास तज्ज्ञ आणि इतिहास अभ्यासक यांना हा चित्रपट दाखवून त्याच्याबद्दलची व्यवस्थित मांडणी करूनच हा चित्रपट रिलीज करावा. जेणेकरून समाजामध्ये संभ्रम निर्माण होणार नाही असं उदयनराजेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे. यावेळी स्वतः छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच लोकांचा भावनांचा आदर करून हा चित्रपट प्रदर्शित करू असा विश्वास व्यक्त केला आहे.

संभाजीराजे छत्रपतींनीही नोंदवलाय आक्षेप

"आपल्या महाराजांचा दैदिप्यमान इतिहास हा हिंदी चित्रपटातून जगासमोर येत असेल तर त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे, यामुळं यापुढं ही आपल्या महाराजांचा इतिहास जगासमोर येत राहील," असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. 

संभाजीराजे छत्रपती यांनी यावर चर्चा होणं गरजेचं आहे असं मत मांडत म्हटलं की, "ट्रेलरमध्ये संभाजी महाराज लेझीम डान्सच्या रुपात खेळताना दाखवण्यात आलं आहे. लेझीम आपला सांस्कृतिक ठेवा आणि ते खेळणं चुकीचं नाही. पण एका गाण्याच्या स्वरुपात आपला आनंदोत्सव साजरा करत असताना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं कितपत योग्य आहे, नाही यावर चर्चा होणं गरजेचं आहे".

अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?

"फक्त ट्रेलर पाहून चित्रपटात नेमकं काय आहे, याचा पूर्ण अंदाज बांधणं कठीण आहे. ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई लेझीम नृत्य करताना पाहायला मिळत आहे. हे आपलं पारंपरिक नृत्य आहे आणि या चित्रपटात या नृत्याची पेरणी नेमकी कशा अर्थाने करण्यात आली आहे, या मागचा उद्देश नेमका काय? हे चित्रपट पाहिल्या शिवाय लक्षात येणार नाही. म्ही स्वराज्यरक्षक मालिका साकारताना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाला गालबोट लागणार नाही, याची खबरदारी घेतली होती. तशाच प्रकारे छावाच्या संपूर्ण टीमने ही याची खबरदारी घेतली असेल आणि ही अपेक्षा पूर्ण झाली असेल तर छोट्या गोष्टीवरून वादंग निर्माण करण्याची आवश्यकता नाही, असं मला व्यक्तिगत वाटतं," असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.