ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसलेने (Zanai Bhosle) नुकताच मुंबईत आपला 23 वा वाढदिवस साजरा केला. जनाई भोसलेने इंस्टाग्रामवर आपल्या वाढदिवसाच्या पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. त्यातील एका फोटोने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. या फोटोत ती भारतीय क्रिकेटर मोहम्मद सिराजसह मनमोकळ्या गप्पा मारताना दिसत आहे. या फोटोमधील दोघांमधील संवाद आणि भावना पाहून अनेकांना वेगवेगळे अर्थ लावले आहेत. काही नेटकऱ्यांना दोघं एकमेकांना डेट करत असल्याचा संशय आला आहे.
जनाई भोसले छत्रपती शिवाजी महाराज चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. तिच्या 23 व्या वाढदिवसाला बॉलिवूड तसंच टीव्ही इंडस्ट्रीतील अभिनेत्यांसह क्रिकेटर्सनीही हजेरी लावली. दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडीओत जनाई आणि मोहम्मद सिराज एकमेकांकडे पाहून हसताना दिसत आहेत.
जनाईने तिच्या पाहुण्यांसोबतचे इतर अनेक फोटो शेअर केले आहेत. परंतु सिराजसोबतचा तिचा फोटो हा तिच्या वाढदिवसाच्या अल्बममधील सर्वाधिक लक्ष खेचणारा फोटो होता. तिने इंस्टाग्रामवरील तिच्या पोस्टला "23' योग्यप्रकारे झाले" असं कॅप्शन दिलं आहे. सोबत तिने निळ्या रंगातील हृदय आणि स्टार इमोजी जोडली आहे.
तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये अभिनेता जॅकी श्रॉफ, तिची आजी आशा भोसले, क्रिकेटपटू श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सुयश प्रभुदेसाई, बिग बॉसचा माजी स्पर्धक आयेशा खान आणि मुंज्या स्टार अभय वर्मा यांचा समावेश होता.