'...तरी अनेक अडचणी'; अजित पवारांसह सत्तेत असतानाही धनंजय मुंडे असं का म्हणाले?

Dhananjay Munde : कृषीमंत्री झालो तर अनेक अडचणी आहेत असं विधान मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड येथील सभेत केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे धनंजय मुंडे मंत्रीपदावर नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत.

आकाश नेटके | Updated: Aug 28, 2023, 09:16 AM IST
'...तरी अनेक अडचणी'; अजित पवारांसह सत्तेत असतानाही धनंजय मुंडे असं का म्हणाले? title=

Maharashtra Politics : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची काही दिवसांपूर्वी बीडमध्ये सभा पार पडली होती. त्यानंतर आता रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचीही बीडमध्ये सभा पार पडली आहे. बीडमध्ये पार पडलेल्या सभेत अजित पवार यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचं कौतुक केलं आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांसह धनंजय मुंडे यांनीही जोरदार फटकेबाजी केली आहे. दरम्यान या भाषणावेळी धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यमुळे राजकीय वर्तुळात वेगळ्याच चर्चांना उधाण आलं आहे.

मी कृषी विभागाचा मंत्री असलो तरी अनेक अडचणी आहेत असे धनंजय मुंडे यांनी त्यांच्य भाषणात म्हटलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिपदावर नाराज आहेत का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

"आजची सभा ही 17 तारखेला बीडमध्ये. झालेल्या सभेच्या उत्तराची नाही तर बीड जिल्ह्यातील मायबाप जनतेच्या उत्तरदायित्वाची सभा आहे. बीड जिल्ह्याने शरद पवारांवर फार प्रेम केलं. मात्र त्याबद्दल साहेबांनी बीड जिल्ह्याला काय दिलं हा प्रश्न आहे. पण शरद पवारांचे उत्तरदायित्व विकासाच्या माध्यमातून आजपर्यंत बीड जिल्ह्याला अजितदादांनी दिले आहे. आजची सभा ही बीड जिल्ह्याच्या विकासाची, अस्मितेची, सन्मानाची आणि जिल्ह्यातील संपूर्ण दुष्काळ मिटवणारी सभा आहे. त्यासाठी आपला आवाज दिल्लीत गेला पाहिजे. या जिल्ह्याच्या अनेक अपेक्षा अजितदादांनी पूर्ण केल्या. म्हणूनच त्यांना एकच वादा, अजितदादा म्हटल जातं. अजितदादांशिवाय बीड जिल्ह्यातील असंख्य प्रश्न सुटू शकत नाहीत," असे धनंजय मुंडे म्हणाले.

"बीड जिल्ह्यातील मान्यवरांनी अनेक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. आम्ही बीडकरांची सेवा करत राहणार आणि आमचे उत्तरदायित्व पार पाडणार. पण मला एका गोष्टीची खंत वाटते. माझा इतिहास सर्वांना माहिती आहे तरीही 17 तारखेच्या पूर्वसंध्येला माझा इतिहास विचारला गेला आणि धनंजय मुंडेंनी तो इतिहास जनतेला सांगावा असे सांगितले. माझ्या राजकीय इतिहासाच्या सुरुवातीच्या काळात अजितदादांनी मदत केली असेल तर अजितदादांचे नेतृत्व स्वीकारून उत्तरदायित्व पुढे नेले ही चूक केली का?," असा सवाल धनंजय मुंडेंनी केला.

"माझ्या पाचवीला संघर्ष पुजला आहे. मी कृषी विभागाचा मंत्री असलो तरी अनेक अडचणी आहेत. तुम्ही आज शेतमजुराच्या पोराला कृषी विभागाची जबाबदारी दिली त्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल अशी जबाबदारी मी पार पाडेन, आज आदरणीय शरद पवार साहेबांच्या व्यासपीठावर आम्हाला संस्कार दिसत नाहीत. कोणीही उठावे आणि काहीही बोलावे हे साहेबांचे संस्कार नाहीत" असेही धनंजय मुंडे म्हणाले.