Maharashtra Assembly Elections 2024 : बीडमधील भगवान भक्तीगडावर पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा पार पडला..या मेळाव्यामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या तिसऱ्या पिढीची एंट्री झाली. या मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी त्यांचा मुलगा आर्यमन याची ओळख करून दिली. आर्यमन पालवे गोपीनाथ मुंडेंची तिसरी पिढी म्हणून राजकारणात येणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. zee 24 taas च्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी आर्यमन पालवे राजकारणात येणार का याबाबत मोठा खुलासा केला आहे.
भगवान भक्तीगडावर दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात पंकजा मुंडेंचा मुलगा आर्यमान देखील व्यासपीठावर उपस्थित होता. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या मुलाला आवर्जून जवळ बोलावून घेतले. यानंतर पंकजा मुंडे यांनी आपला मुलगा आर्यमान याची उपस्थितांना ओळख करुन दिली. मुलाची ओळख करुन देताना पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर संकट आले तेव्हा माझी जनता माझ्यासोबत उभी राहिली. मी निवडणूक हरले म्हणून पोरांनी जीव दिले यापेक्षा जास्त काय प्रेम असायला हवे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्तांचे कौतुक केले.
हा जो गोरा गोरा मुलगा आहे तो कोण आहे. हा माझ्यापेक्षा फार उंच आहे. फार गोड आहे. हा माझा मुलगा आर्यमन आहे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मुलाची सर्वांना ओळख करुन दिली. आर्यमन भगवान बाबाच्या दर्शनाला आला असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. मात्र, आर्यमन पेक्षा माझी जनता मला जास्त प्रिय आहे, असं पंकजा मुंडे या म्हणाल्या. माझ्यावर जीएसटीचा छापा पडला तेव्हा 12 कोटी या जनतेने भरले होते. माझा निकाल लागला तेव्हा कार्यकर्त्यांनी जीव दिला. जनतेने मला भरपूर प्रेम दिले यामुळे जनताच मला जास्त प्रिय आहे असं पंकजा मुंडे यांनी आयर्मन याला सांगितले.
आर्यमन पालवे राजकारणात येणार का? असा प्रश्न zee 24 taas च्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी आर्यमन याच्या दसऱ्या मेळाव्याच्या उपस्थितीचा उल्लेख केला. आर्यमन हा भगवान भक्तीगडावर दर्शनासाठी आला होता. मी फक्त उपस्थितांमध्ये त्याचे नाव घेऊन सर्वांना त्याची ओळख करुन दिली. आर्यमन हा अजून शिक्षण घेत आहे. तो त्याचे शिक्षण पूर्ण करेल यानंतर तो व्यवयास करेल. मात्र, भविष्यात तो राजकारणात येईल की नाही ते त्यावेळच्या राजकीय परिस्थीतीवर तसेच त्याच्या निर्णयावर अवलंबून असेल असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला आहे.