Maharashtra Assembly Election 2024: राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील संभ्रम कायम असतानाच भारतीय जनता पार्टीसाठी एक गुड न्यूज आहे. भारतीय जनता पार्टीच्या समर्थक आमदारांची संख्या 132 वरुन 137 वर पोहचली आहे. लहान-मोठ्या पक्षांबरोबरच अपक्षांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं अशी मागणी करत या आमदारांनी आपला पाठिंबा भाजपाला जाहीर केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 41 जागा जिंकणाऱ्या अजित पवारांच्या पक्षाचा फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी पाठिंबा आहे. त्यामुळे आधीच भाजपाकडे फडणवीस समर्थक आमदारांची संख्या 173 इतकी होती. त्यात आता अनेक अपक्ष आमदारांनी फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठींब्यामुळे निवडून आलेल्या आमदारांपैकी 178 आमदारांचा मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांना पाठींबा असल्याचं स्पष्ट झालं आहे.
विधानसभेतील नवनिर्वाचित पाच आमदारांनी फडणवीसांना मुख्यमंत्री करावं म्हणत भाजपला पाठिंबा दर्शवला आहे. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे आणि अशोकराव माने यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणांनीही भाजपाला पाठिंबा दर्शवला आहे. भाजपाला पाठिंबा दर्शवणारा पाचवे आमदार हे अपक्ष असून त्यांचं नाव शिवाजी पाटील असं आहे.
नक्की वाचा >> 'भाजपाशी जवळीक भोवली!' पराभूत उमेदवारांनी राज ठाकरेंना स्पष्टच सांगितलं; बैठकीतली Inside Story
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून मुख्यमंत्रिपदासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन असं कराडमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. दुसरीकडे शिंदे गटाचे नेते मात्र शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात चांगलं काम झालं असून त्यांनाच मुख्यमंत्री करावं अशी मागणी करत आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी सध्या शिंदे आणि फडणवीसांमध्ये चुरस असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच फडणवीसांच्या सीएम पदासाठी पाठिंबा दिवसोंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील काही प्रमुख नेते दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीमध्ये केंद्रीय नेतृत्वाबरोबर चर्चा करुन मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण हे स्पष्ट केलं जाईल असं सांगितलं जात आहे. आज संध्याकाळपर्यंत हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. तसेच 26 तारखेपर्यंत शपथविधी झाला नाही तर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागेल हे वृत्त चुकीचं असल्याचं, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
नक्की वाचा >> विरोधी पक्षनेता पदाबद्दल विचारताच अजित पवार आभाळाकडे पाहत हसत म्हणाले, 'आमचं मन पार...'
भाजपाने 132 जागा जिंकल्या असून एकानाथ शिंदेंच्या पक्षाने 57 जागांवर विजय मिळावला आहे. अजित पवारांच्या पक्षाने 41 जागांवर विजय मिळवला असून महाविकास आघाडीमधील तिन्ही घटक पक्षांना मिळून 50 चा आकडाही गाठता आलेला नाही.