IND VS AUS 1st Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफी सीरिजचा पहिला सामना पार पडला. पर्थ येथे पार पडलेला पहिलाच टेस्ट सामना टीम इंडियाने 295 धावांनी जिंकून ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिलाय. यासह टीम इंडियाने 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांना ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना 238 धावांवर रोखणे शक्य झाले आणि या सामन्यामुळे WTC फायनलची समीकरण सुद्धा बदलली आहेत.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु आहे. 22 नोव्हेंबर पासून पर्थ येथे पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्याचा टॉस टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाचे फलंदाज मोठी खेळी करण्यात फ्लॉप ठरले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्यांना 150 धावांवर ऑल आउट केलं. मात्र ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरु झाल्यावर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आपल्या घातक गोलंदाजीने सामन्यात भारताची वापसी करून दिली. त्यांनी ऑस्ट्रेलियाला अवघ्या 104 धावांवर ऑल आउट केले.
फलंदाजीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी करून भारताची आघाडी ही 500 पार पोहोचवली. यात यशस्वी जयस्वालने 161, केएल राहुलने 77, पड्डीकलने 25, सुंदरने 29, तर नितेश रेड्डीने 38 आणि विराट कोहलीने नाबाद 100 धावांची खेळी केली. टीम इंडियाने दुसऱ्या इनिंगमध्ये जवळपास 487 धावा करून डाव घोषित केला. चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या सर्व फलंदाजांना 238 धावांवर बाद करण्यात टीम इंडियाचे गोलंदाज यशस्वी ठरले. यात बुमराहने 3, हर्षित राणाने 3 तर वॉशिंग्टन सुंदरने 2 आणि नितेश रेड्डीने 1 विकेट घेतली. त्यामुळे भारताने विक्रमी धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला.
हेही वाचा : मॅच दरम्यान दिसली अकाय कोहलीची पहिली झलक, फॅन्स म्हणाले सेम टू सेम विराट, पाहा PHOTO
टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धची सीरिज गमावल्यामुळे WTC पॉईंट्स टेबलमध्ये नंबर 1 वर असलेलया टीम इंडियाची नंबर 2 वर घसरण झाली होती. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये सध्या ऑस्ट्रेलिया 62.50 च्या विजयाची टक्केवारीने नंबर 1 वर आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाला फायनलमध्ये जाण्यासाठी 5 सामन्यांपैकी 4 सामने जिंकावे लागणार होते. आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध सीरिजमधील पहिला सामना जिंकल्यामुळे टीम इंडियाला WTC फायनलमध्ये जाण्यासाठी केवळ 3 सामने जिंकायचे आहेत. जर उर्वरित 3 सामने जिंकण्यात भारताला यश आलं नाही तर टीम इंडियाला WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल. WTC फायनलची फायनल जून 2025 मध्ये लंडन येथील लॉर्ड्स मैदानावर खेळवला जाईल.