Manoj Jarange on Vidhansabha: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजताच मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत. विधानसभा लढणार की उमेदवार पाडणार? यासंदर्भातला निर्णय 20 ऑक्टोबरला घेणार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय. इच्छुकांनी निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रं तयार ठेवावीत असं आवाहनही जरांगे पाटलांनी केलंय. जरांगे विधानसभेला पाडणार की लढणार याचा फैसला येत्या रविवारी होणार आहे. लोकसभेला राज्यातल्या अनेक मतदारसंघात जरांगे फॅक्टर चालला. लोकसभेत मराठवाड्यात मोठं नुकसान होऊनही सत्ताधाऱ्यांनी जरांगेंची आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही. आचारसंहितेचा जरांगेंनी दिलेला अल्टिमेटमही पाळला नाही. त्यामुळं जरांगेंनी पुन्हा मैदानात उतरण्याची घोषणा केलीय. विधानसभेला लढणार की पाडणार याबाबत स्पष्ट भूमिका 20 ऑक्टोबरला जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.
इतकंच नाही तर इच्छुकांनी निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रं तयार ठेवावीत असं आवाहनही जरांगेंनी केलंय. इच्छुकांशी संवाद साधून जरांगे चर्चा करणार आहेत. निवडणूक लढायची ठरली तर सर्वच जाती धर्माचे उमेदवार निवडणुकीत उतरवणार, असंही जरांगेंनी स्पष्ट केलंय.
आरक्षणाच्या मुद्यावरून चर्चेत आलेल्या जरांगे पाटलांनी राजकीय पटलावरही आपली ताकद दाखवून दिली.
मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीला जरांगे फॅक्टरचा फटका बसल्याची चर्चा होत आहे. मराठा आरक्षणामध्ये देवेंद्र फडणवीस खोडा घालत असल्याचा आरोप जरांगे पाटील वारंवार करतात. जरांगेंनी लढायचं ठरवलं तरी ते फडणवीस आणि भाजपविरोधात लढतील आणि पाडायचं ठरवलं तरी ते भाजपचेच उमेदवार पाडतील हे स्पष्ट झालंय.
राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलाय. आरक्षणाचं होमग्राऊंड ठरलेल्या मराठवाड्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. लोकसभेत मराठवाड्यातील अनेक दिग्गज नेत्यांचं गणित मनोज जरांगे पाटलांच्या सामाजिक आंदोलनानं कोलमडलं होतं.. यामध्ये पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे आणि अशोक चव्हाण भाजपात गेल्यानंतरही प्रताप पाटील चिखलीकर यांचा लोकसभेत दारुण पराभव झाला.. त्यामुळे आता विधानसभेत याच दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.मनोज जरांगेच्या आंदोलनाचं होमग्राऊंड असलेल्या जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवेंना पराभवाचा सामना करावा लागला होता.. आता त्यांच्यापुढे मुलगा संतोष दानवेंची जागा टिकवण्याचं आव्हान असणार आहे.. मराठा समाजाचा रोष अंगावर घेऊन काम करणं दानवेंना चांगलंच आव्हानात्मक असणार आहे.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपवासी झाले.. तरीही नांदेडमधून प्रताप पाटील यांचा दारुण पराभव झाला त्यामुळे अशोक चव्हाणांपुढे स्वत:साठी तसंच मुलगी श्रीजयाच्या राजकीय भविष्यासाठी अस्तित्वाची लढाई असणार आहे.लातूर हा काँग्रेसचा पारंपरिक गड मात्र इथं यावेळी पहिल्यांदा देशमुख विरूद्ध चाकुरकर अशी लढत रंगणार आहे... काँग्रेससारख्या एकाच पक्षात राहूनही वर्षांनूवर्षे मनात असलेली देशमुख विरोधी खदखद यावेळी चाकूरकर कुटुंबातील उमेदवारामुळे बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे.संभाजीनगरमधील संजय शिरसाट आणि धाराशिवमध्ये मंत्री तानाजी सावंत यांच्यासाठी सुद्धा विधानसभा निवडणूक प्रतिष्ठेची आहे.. संजय शिरसाट हे वारंवार उद्धव ठाकरेंवर आरोप करत आहेत.. तर आपल्या वादग्रस्त विधानामुळे तानाजी सावंत हे टार्गेटवर आहेत. त्यामुळे या दोघांसाठीही ही निवडणूक आव्हानात्मक असेल.