अहमदनगर: पारनेर तालुक्यातील निघोज येथे आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी आणि जावयाला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याच्या 'सैराट' हत्या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळण्याची शक्यता निर्माण झालीय. पोलिसांनी केलेल्या तपासात या प्रकरणात जखमी झालेला मंगेश रणसिंग यानेच पत्नी रुक्मिणीच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची खळबळनजक माहिती समोर आली आहे. रुक्मिणीच्या सहा वर्षीय भावाने आणि पाच वर्षीय बहिणीने पोलिसांना तसा जबाब दिला आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासाची दिशा पूर्णपणे बदलली आहे.
तत्पूर्वी रुक्मिणीचा पती मंगेशच्या तक्रारीवरून पारनेर पोलिसांनी आतापर्यंत रुक्मिणीचे वडील, काका, मामा यांना अटक केली आहे. तर राज्य सरकार आणि महिला आयोगानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच याबाबतचा अहवाल तातडीने राज्य महिला आयोगाकडे पाठवण्यासही सांगण्यात आले आहे. मात्र, आता रुक्मिणीचा लहान भाऊ आणि बहिणीच्या जबाबाने या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
ऑनर किलिंगच्या भीतीने मुलीची आई-वडिलांविरोधात हायकोर्टात याचिका
अहमदनगरमधील या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र चांगलाच हादरला होता. मंगेश आणि रुक्मिणी यांच्या आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे रुक्मिणीच्या काका आणि मामाने दोघांना पेट्रोल टाकून जाळले होते. यामध्ये रुक्मिणीचा मृत्यू झाला होता तर मंगेशवर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.