योगेश खरे, नाशिक : जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीला सध्या अंधश्रद्धेचं ग्रहण लागले आहे. या बँकेच्या संचालक मंडळाने बँकेच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीला नूतन वास्तूच्या जागेला दोष देण्यास सुरुवात केली आहे. ही जागा कधीकाळी कब्रस्तानची असल्यामुळे याठिकाणी भुताटकी असल्याचाही चर्चा संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जुन्या सीबीएस जवळील इमारतीत पुन्हा बँक सुरू करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे नाचता येईना अंगण वाकडे अशी काहीशी परिस्थिती नाशिक जिल्हा बँकेची झाली आहे. यापूर्वीही मांत्रिकाला बोलावून असे प्रकार करण्यात आले होते याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निषेध केला आहे.
गेल्या दहा वर्षांपूर्वी जिल्हा बँकेचे नवीन इमारतीत स्थलांतर झाले होते. जिल्हा बँकेचे एकूण 2700 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. निफाड सहकारी साखर कारखान्यावर 140 कोटींची थकबाकी आहे. पीककर्ज आणि शेतीशी संबंधित बँकेचे 1 लाख 17 हजार थकबाकीदार आहेत. त्यात 6500 बडे थकबाकीदार आहेत. 650 थकबाकीदारांची लिलावासाठी मालमत्ता जोडणी सुरू आहे.
कर्जवसुलीसाठी सध्या शेतकऱ्यांच्या शेती ट्रॅक्टर यांची जप्ती आणि लिलाव सुरू आहे. 2015 मध्ये नोकरभरती सीसीटीव्ही फर्निचर तसेच अनेक कोट्यवधींची कामे केल्याने बँक वादात सापडली होती. नोटा बंदीच्या काळात 47 कोटी रुपयांचा घोळ झाल्याने बँकेवर नामुष्की ओढावली होती.