Crime News : NASA, ISRO च्या नावाने पुणेकरांना गंडवले; तब्बल 250 जणांची फसवणूक

थेट NASA, ISRO च्या नावाने 250 लोकांना गंडवलं. पुणेकरांना महाठगांनी फसवलं आहे.

Updated: Feb 2, 2023, 04:10 PM IST
Crime News : NASA, ISRO च्या नावाने पुणेकरांना गंडवले; तब्बल 250 जणांची फसवणूक  title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : NASA, ISRO च्या नावाने पुणेकरांना गंडा घालण्यात आला आहे. तब्बल 250 जणांची फसवणूक करण्यात आली आहे (Fraud of 250 people in Pune). या सर्वांची तब्बल 5 ते 6 कोटी रुपयांना फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार घडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत (Pune Crime News).

नासा आणि इस्रोमध्ये वापरत असलेल्या राइस पुलर यंत्राच्या विक्रीतून भरपूर मालामाल व्हाल असे सांगत पुण्यातील 250 पेक्षा अधिक लोकांना चुना लावण्यात आला आहे. नासा, इस्रो यासारख्या संशोधन संस्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक करून मोठा लाभ मिळवण्याचे आमिष दाखवून या टोळीने पुण्यातील 250 हून अधिक लोकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नासा, इस्रोसारख्या अनेक संस्था उपग्रहांमध्ये वापरत असलेल्या धातूच्या व्यवसायात गुंतवणूक केल्यास फार मोठ्या पटीने फायदा होऊ शकतो, असे सांगून या चार जणांच्या टोळीने पुण्यातील अनेकांना गंडा घातला. पुणे स्टेशन परिसरातील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये या चारही आरोपींनी गुंतवणूकदारांसाठी एक बैठक बोलावली होती आणि त्यात एका मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन देखील केले. 

अमेरिकेच्या संशोधन संस्था ''नासा’ मधील लोकं भारतात येणार आहेत. यावेळी शास्त्रज्ञ राइस पूलर यंत्राचाच्या संशोधनाबाबत माहिती देतील.  राइस पूलर या धातुच्या भांड्याला मागणी संपूर्ण जगात असल्यामुळे आरोपींनी गुंतवणूकदारांना एक लाख गुंतवले तर एक कोटीचा नफा होईल अशी बतावणी केली होती. 

इतकंच काय तर या आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून नागरिकांकडून पैसे जमा केले. पुण्यातील 250 हून अधिक लोकांची जवळपास ६ कोटी रुपयाची फसवणूक झाली असल्याची माहिती, पोलिस उपायुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) श्रीनिवास घाडगे यांनी दिलीय.

या प्रकरणी राम गायकवाड, रामचंद्र वाघमारे, संतोष सकपाळ, राहुल जाधव यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून या सगळ्यांचा शोध सुरू केला आहे आणि त्यासाठी पथकं तयार करण्यात आली आहेत.

काय आहे राइस पुलर

कॉपर इरेडियम हा एक प्रकारचा धातू आहे. या मौल्यवान धातूची क्षमता शोधण्यासाठी राइस पुलिंग या चाचणीचा वापर केला जातो. या प्रक्रियेत तांदूळ एका बाजूला ठेवून समोर कॉपर इरेडियम धातूची वस्तू ठेवली जाते. ही वस्तू तो तांदूळ किती अंतरावरून खेचून घेते, यावर या वस्तूची किंमत ठरते. जितक्या जास्त लांबीवरून तांदूळ खेचला जाईल तितकी जास्त किंमत मिळते. यालाच राइस पुलिंग म्हणतात.