Covid 19: महाराष्ट्रात करोनाचे (Coronavirus) रुग्ण आढळत असून चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह (Mumbai) महाराष्ट्रात (Maharashtra) सतत रुग्ण आढळत असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यात करोनाची आणखी एखादी लाट येणार का? असा प्रश्न सर्वांना सतावत आहे. शुक्रवारी राज्यात करोनाचे 425 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यातील सक्रीय रुग्णसंख्या 3090 वर पोहोचली आहे.
राज्यात आढळलेल्या 425 रुग्णांपैकी एकट्या मुंबईत 177 रुग्ण आढळले आहेत. यासह शहरातील सक्रीय रुग्णसंख्या 937इचकी झाली आहे. मात्र रुग्णसंख्या वाढत असली तरी चाचण्यांची संख्या अद्याप वाढवण्यात आलेली नाही. 31 मार्चला एकूण 1299 चाचण्या करण्यात आल्या.
मुंबईतील टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट 13.6 टक्क्यांवर पोहोचली आहे. महापालिकेकडून कमी प्रमाणात चाचण्या होत असल्याने तसंच लोकांचा चाचणींसाठी जास्त प्रतिसाद नसल्यानेच हा आकडा कमी असावा असा अंदाज आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, लोकांनी आता जगण्यासाठी सर्वसामान्य दृष्टीकोन स्विकारला आहे आणि लक्षणं नसलेले लोक चाचणीसाठी तयार होत नाहीत.
फोर्टिज रुग्णालयाच्या क्रिटिकल केअरच्या प्रमुख आणि वरिष्ठ सल्लागार डॉ. वैशाली सोलाओ यांनी XBB1.16 स्ट्रेनचा मागोवा ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जीनोमिक चाचणीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे असा सल्ला इंडिया टुडेशी बोलताना दिला आहे.
"अधिकाऱ्यांनी आता RTPCR/RAT वर भर देण्याचा विचार केला पाहिजे. तसंच शहरात बेड उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरु केले पाहिजेत. याशिवाय त्यांनी लोकांना करोनाच्या नियमांचं पालन करण्यासाठी, मास्क घालण्यासाठी लोकांना आवाहन करत सतत भर दिला पाहिजे," असंही त्यांनी सांगितलं आहे.
एसएल रहेजा हॉस्पिटलच्या क्रिटिकल केअर विभागाच्या सल्लागार आणि प्रमुख डॉ. संजीथ ससीधरन यांनी महाराष्ट्रातील स्थिती नक्कीच चिंताजनक आहे, पण धोक्याची घंटा देणारी नाही असं सांगितलं आहे.
"महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णसंख्येत होणारी वाढ ही नक्कीच चिंताजनक आहे, पण धोक्याची घंटा नाही. अनेक रुग्णांची स्थिती गंभीर नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. मृत रुग्णांमध्ये अनेक व्याधी असणाऱ्या वरिष्ठ नागरिकांची संख्या जास्त आहे. जर एखादा व्हेरियंट असेल तर त्याची ओळख पटवण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग केलं पाहिजे. म्हणजे त्यानुसार योग्य ती काळजी घेता येएली. तसंच विमानातळं आणि देशात प्रवेश करण्यासाठी वापर होणाऱ्या ठिकाणी चाचण्या वाढवल्यास त्याचाही फायदा होईल," असं त्यांनी सांगितलं आहे.
डॉ संजीथ ससीधरन यांनी यावेळी लसीकरण मोहीम वाढवण्याची गरज असल्याचं मत नोंदवलं. लसीकरणामुळे आरोग्य सेवांवरील भार कमी होतो आणि मृत्यू देखील टाळता येतो असंही ते म्हणाले. "याशिवाय योग्य माहिती मिळेल याची काळजी घेणं गरजेचं आहे. खोटी माहिती लोकांना मिळणे आणि त्यातून लोकांमध्ये भीती पसरणं जास्त धोकादायक आहे," असं ते म्हणाले आहेत.