मुंबई : Tauktae चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात खबरदारी घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणसह पालघर जिल्हाधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. लक्षद्वीप समुद्र भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन रत्नागिरी, (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळासह जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचवेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. हे वारे ताशी 60 ते 70 वेगाने वाहणार आहेत. याचा फटका सर्वाधिक गोव्यासह रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला बसण्याची शक्यता आहे. सध्या हे वादळ गोव्याच्या 350 किलोमीटर दूर आहे, 24 तासात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीपर्यंत येईल, अशी माहिती कुलाबा हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुत्ते यांनी दिली.
Tauktae चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यात मासेमारांना अलर्ट केले आहे. सर्वाधिक परिणाम सिंधुदुर्ग, रत्नागिरीला जाणवेल. 16 तारखेला रायगड मुंबई पालघर याठिकाणी परिणाम जाणवेल तर 18 तारखेला हे वादळ गुजरातच्या दिशेने विरावळ, पोरबंदर ते नलिया या किनारपट्ट्यांमध्ये धडकेल. 60 ते 70 प्रति किलोमीटर वाऱ्याच्या वेगामुळे झाडे आणि कच्च्या घरांची पडझड होईल, अशी शक्यता आहे. गुजरानंतर हे वादळ पाकिस्तानच्या दिशेने कराचीकडे सरकणार आहे.
मुंबई महापालिका आयुक्त इक्बारसिंह चहल, सर्व सहायक आयुक्त , NDRF चे वरिष्ठ अधिकारी आणि शहर आणि उपनगर जिल्हा आपतकालिन विभागाचे वरीष्ठ अधिकारी तसेच नौदल अधिकारीही उपस्थितीत बैठकी झाली. ही बैठक VC व्दारे पार पडली. यावेळी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, मुंबईत आज ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत तर उद्या 60 ते 70 ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
मुंबईत कोविड सेंटरला पर्यायी विद्युत व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गरज असेल तर रुग्ण हलवले जातील असे सांगण्यात आले आहेत. Ndrf आणि नेव्ही विभागाकडून गरज लागली तर मदत घेतली जाईल , या विभागाने आम्ही तयार असल्याचं म्हटले आहे.
मुंबईत सर्व समुद्र किनाऱ्यावर अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत जोरदार वाऱ्यामुळे झाड पडली तर आणि पडलेली झाडे हटवण्याच्या अधिकाऱ्याना सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, रत्नागिरी, (Ratnagiri)आणि सिंधुदुर्गात (Sindhudurg) वादळासह जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्याचवेळी जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मासेमारी करण्यासाठी कोणीही समुद्रात जाऊ नये, असा इशारा जिल्हा प्रशासनाने मच्छिमारांना दिला आहे. दरम्यान, 'ऑरेंज अॅलर्ट' जारी करण्यात आला आहे.