विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : औरंगाबादच नाव संभाजीनगर करण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भाजपनं यासंबंधीचा प्रस्ताव महापालिकेत सादर केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच स्वप्न पूर्ण करावं असं आवाहन शिवसेनेला केलं आहे. मात्र या प्रस्तावामुळं आता शिवसेना अडचणीत य़ेण्याची शक्यता आहे.
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं हा वाद गेल्या 28 वर्षांपासून सुरु आहे, 1988 मध्ये औरंगाबादच्या सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा हा नारा दिला होता, तेव्हापासून औरंगाबादेत शिवसेना संभाजीनगर की औरंगाबाद या मुद्द्यावरूनच निवडणूका लढते आहे. त्यात आता सत्तांतर झालं, राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीनं शिवेसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत. यातच शिवसेनेची कोंडी कऱण्यासाठी भाजपनं नवी खेळी केली आहे. भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी नव्यानं औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करावं असा प्रस्ताव मांडला आहे.
शिवसेनेला या शहराचं नाव बदलायचं आहे, मात्र सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत असल्यानं सध्या हा मुद्दा त्यांना अडचणीचा आहे. सारवासारव करणं शिवसेनेकडून सुरु आहे, या आधी 2013 आणि 2016 ला अशा आशयाचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवला आहे.
सर्वसामान्य नागरिकांची याबाबत वेगळी मत आहे, कुणी विरोध करतंय.. तर कुणी पहिले पायाभूत सुविधांकडे लक्ष द्या अशी मागणी करतं आहे.
या शहराचं मलिक अबंर यानं ठेवलेलं जुनं नाव म्हणजे खडकी, त्यानंतर औरंगजेब या भागाचा सुभेदार झाला आणि त्यानं या शहराच नाव औरंगाबाद केलं. त्यात 1988 मध्ये बाळासाहेबांनी नारा दिल्यावर शिवसेना भाजप या शहराला संभाजीनगर म्हणायला लागले.