Beed Crime: 20 दिवसानंतरही पोलिसांना आरोपी सापडेना, संतोष देशमुखांना हायकोर्टात न्याय मिळेल का?

Beed Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला 20 दिवस झालेत. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 30, 2024, 09:15 PM IST
Beed Crime: 20 दिवसानंतरही पोलिसांना आरोपी सापडेना, संतोष देशमुखांना हायकोर्टात न्याय मिळेल का? title=
देशमुख हायकोर्टात

Beed Crime: बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण आता हायकोर्टात पोहोचलंय. संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रेट याचिका दाखल केलीय.पुढील तपासाबाबत न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला दिशा देण्याबाबत याचिका दाखल करण्यात आलीय.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येला 20 दिवस झालेत. सीआयडी आणि पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. पण पोलिसांना अजूनही आरोपी सापडलेले नाहीत. पोलिसांच्या तपासावर देशमुख कुटुंब समाधानी दिसत नाही. त्यामुळंच देशमुख कुटुंबानं मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचे दरवाजे ठोठावलेत. संतोष देशमुख य़ांचा भाऊ धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणी उच्च न्यायालयात क्रिमिनल रीट याचिका दाखल करण्यात आलीय. पुढील तपासाबाबत न्यायालयाने योग्य तो आदेश देत तपासाला दिशा देण्याबाबत याचिका दाखल करण्यात आलीय.

धनंजय़ देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेल्या याचिकेमध्ये काही मुख्य मागण्या केल्यात. सर्व गुन्हेगारांना अटक झालेली नाही, ही गंभीर बाब आहे. याची कोर्टाने दखल घेत योग्य तो आदेश द्यावा. मास्टरमाईंड वाल्मिक कराडच्या अटकेसंदर्भात योग्य ती पावले उचलावी. वाल्मिक कराडवर मोक्का , हत्येचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून तत्काळ हटवत निष्पक्ष  तपास करण्याचे निर्देश द्यावेत. हत्येच्या तपासात कुठलाही राजकीय हस्तक्षेप न ठेवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात आलीय.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणावर ढवळून निघालंय. सर्व आरोपींनी अद्याप का अटक करण्यात आलेली नाही? असा सवाल राज्यभरातून उपस्थित केला जातोय. आता तर धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावलाय.. त्यावर उच्च न्यायालय काय आदेश देतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.