'संतोष देशमुख खून खटला बीडबाहेर चालवा', खटला निष्पक्षपाती चालण्याबाबत विरोधकांना शंका

खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराडवरून राजकीय घमासान सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडचा खटला हा बीड बाहेर चालवावा अशी मागणी करत संजय राऊत यांनी तर थेट सरकारवर निशाणा साधलाय.

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 2, 2025, 06:48 PM IST
'संतोष देशमुख खून खटला बीडबाहेर चालवा',  खटला निष्पक्षपाती चालण्याबाबत विरोधकांना शंका title=

संतोष देशमुख खून खटला जलदगतीनं चालवून यामधील आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी होत असतानाच, खटला बीडच्या कोर्टात चालवू नये अशी मागणी पुढं येऊ लागली आहे. जर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीडमध्ये चालला तर न्याय मिळणार नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलंय. खटल्यातही राजकीय हस्तक्षेपाची भीती विरोधकांना वाटू लागलीये.

'खटला बीड बाहेर चालवावा', विरोधकांची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरण हा विषय खूप गंभीर आहे. त्यामुळे हा खटला बीड जिल्ह्याच्या बाहेर चालला पाहिजे. मात्र, सरकार त्यांचे आहे. गृहमंत्री त्यांचे आहेत. त्यामुळे जर हा खटला महाराष्ट्रात चालला तरी न्याय मिळणार नाही. तरी मी असं मानतो की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आपण सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवूया असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

'...तर न्याय मिळणार नाही'

संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोन एसआयटी लागल्या आहेत. ज्यामध्ये सर्व अधिकारी हे बीडमधील आहेत. केसच्या कोर्टात केजचे पोलिस स्टेशन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. जे पोलीस स्टेशन यांच्या इशाऱ्यावर नाचतं, त्या ठिकाणचे लोक, त्या ठिकाणची सीआयडी आणि एसआयटी, जर विचार केला तर यामध्ये सर्व लोक बीडचे आहेत. त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे की, यामध्ये राज्याचा एखादा वरिष्ठ अधिकारी यामध्ये असावा. त्याचबरोबर राज्याची एक वेगळी टीम यामध्ये असली पाहिजे आणि हा खटला केज आणि बीड जिल्हा सोडून इतर ठिकाणी चालवला पाहिजे. 

'सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची मागणी'

या प्रकरणात आक्रमक पाठपुरावा करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांनी मात्र खटला बाहेर चालवण्याची गरज नसल्याचं म्हटलंय. मात्र आरोपींना बीडच्या जेलमध्ये न ठेवता संभाजीनगर किंवा नाशिकच्या जेलमध्ये ठेवण्याची मागणी सुरेश धस यांनी केलीय. तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणीही सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिलाय. 

राज्यभरात जोरदार चर्चेत असलेला बीडमधील संतोष देशमुख हत्येच्या खटल्यासंदर्भात आता नवी मागणी जोर धरू लागलीय. त्यामुळे हा खटला बीडमध्ये चालवला जातोय की दुसऱ्या जिल्ह्यात चालवला जातोय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.