Dharashiv News : धाराशीवच्या तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम हल्ला प्रकरणी आता एक मोठा ट्विस्ट आलाय. आपल्यावर हल्ला केल्याचा कांगावा करणाऱ्या सरपंच निकम प्रकरणात एक नवी गोष्ट समोर आली आहे. पोलिस तपासात नेमकं असं काय समोर आलंय त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
राज्यात सध्या सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण बरंच गाजत आहे. इतक्यात काही दिवसांपूर्वी मेसाई जवळगा गावाचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरही हल्ल्याची घटना घडली होती. या हल्ल्याचही पवनचक्की कनेक्शन असल्याचं म्हटलं जात होतं. त्यानंतर पोलिसांनीही हे प्रकरण गांभिर्याने घेत तपासाची चक्र फिरवली. मात्र, तपासातून जे समोर आलं त्याने पोलिसच चक्रावून गेलेत. कारण बंदुकीचा परवाना मिळावा यासाठी सरपंच नामदेव निकम यांनीच स्वत: वर हल्ल्याचा बनाव रचल्याच तपासात समोर आलंय. मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम यांच्यावरील हल्ल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, पोलिसांनी यातील सत्य शोधून काढलं.
26 डिसेंबर रोजी रात्री मेसाई जवळगाचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर बाईकस्वारांचा हल्ला केला. गाडीच्या काचा फोडल्या, गाडीवर अंडी फेकली, पेट्रोलने भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या टाकत गाडीसकट नामदेव निकम यांना जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, या हल्लातून नामदेव निकम कसे बसे बचावले.
या संपूर्ण प्रकरणानंतर पोलीसात तक्रार करण्यात आली. अशात आरोपींना पकडण्यासाठी स्वत: नामदेव निकम यांनीच टाकीवर चढून आंदोलन केलं. त्यानंतर पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड झाली आणि त्यानं सगळ्यांना धक्का बसला. बंदुकीसाठी चक्क सरपंचानेच षडयंत्र रचल्याचं समोर आलं.
संतोष देशमुख हत्याप्रकरण तापले पाहून त्याचा फायदा घेऊन नामदेव निकम यांनी हल्ल्याचा बनाव रचला. बंदुकीचा परवाना मिळावा यासाठी हल्ल्याचं खोटं चित्र रंगवलं. आरोपी कितीही हुशार असला तरी कायद्यापासून जास्त काळ पळू शकत नाही. हेच या प्रकरणातून दिसून येतंय. या संपूर्ण प्रकरणानंतर इतर लोकांनाही मोठा धक्का बसला आहे. तर कोणी फक्त बंदूकीचा परवाना मिळावा यासाठी स्वत: विरोधात कट कसा रचू शकतो असा प्रश्न उपस्थित केला आहे.