अशोक चव्हाण म्हणालेत, 'सरकार उत्तम चालले आहे, हम साथ साथ है!'

आमचे सरकार उत्तम चालले आहे. हम साथ साथ है, असे सांगून बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सारवासारव केली. 

Updated: Jan 28, 2020, 11:42 PM IST
अशोक चव्हाण म्हणालेत, 'सरकार उत्तम चालले आहे, हम साथ साथ है!' title=
संग्रहित छाया

नांदेड : मी तीन्ही पक्षांच्या (शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस) किमान समान कार्यक्रमाबाबत बोललो होतो. तीन्ही पक्षांनी एकत्र येऊन तो कार्यक्रम तयार केला आहे. तो लिखित दस्तावेज आहे. मी जे बोललो ते त्याअनुषंगाने होते. मात्र त्या विधानाबाबत ज्या बातम्या आल्या, ती वस्तुस्थिती नाही. मी कोणाच्याही विरोधात बोललेलो नाही. आमचे सरकार उत्तम चालले आहे. हम साथ साथ है, असे सांगून आपल्या विधानावर काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी सारवासारव केली. 

अजित पवारांचा सबुरीचा सल्ला

दरम्यान, जो पर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचा महाविकास आघाडी सरकारवर वरदहस्त आहे तोपर्यंत बाकीच्या चर्चा व्यर्थ आहे. यावर चर्चा करणे योग्य नाही, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना सल्ला दिला आहे. तीन पक्षांचे सरकार आहे. या सरकारमध्ये काम करत असताना शंका कुशंका आणि गैरसमज निर्माण होईल, असे वक्तव्य कोणीही करु नये, असा सल्लादेखील अजित पवार यांनी दिला.

...तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार, बाकीच्या चर्चा व्यर्थ - अजित पवार

सरकारकडून कोणतीही घटनाबाह्य कृती घडल्यास काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर पडेल, असे वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केले होते. ते रविवारी नांदेडमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारच्या स्थापनेवेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये झालेल्या करारादरम्यांचा खुलासा केला होता. मात्र, विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर आणि सरकारमधील मंत्र्यांनी याबाबत अशी काही  विधान करु नये, अशी भूमिका घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांनी आज स्पष्टीकरण देत सावध प्रतिक्रिया दिली. 

अशोक चव्हाण नेमके काय म्हणाले होते?

 महाराष्ट्रात तीन पक्षाचे व तीन विचारांचे सरकार चालणार कसे, असा सवाल करीत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी तीन पक्षाच्या सरकारला (महाविकास आघाडी) विरोध केला होता, परंतु, आम्ही सोनिया गांधी यांना राजी केले. परंतु, त्यावेळी आम्ही घटनाबाह्य काम करणार नाही, असे शिवसेनेकडून लिहून घेतले. सेनेने जर उद्देशिकबाहेर काम केले तर आम्ही सरकारमधून बाहेर पडू, असे अशोक चव्हाण नांदेड येथे म्हणाले होते.