अमरावतीमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला वेगळं वळण; गायब झालेल्या मुलीनेच दिली महत्त्वाची माहिती

खासदार नवनीत राणा आणि खासदार अनिल बोंडें यांनी या संपूर्ण प्रकरणात लव जिहादचा झाल्याचा आरोप केला होता

Updated: Sep 8, 2022, 04:51 PM IST
 अमरावतीमधील कथित लव्ह जिहाद प्रकरणाला वेगळं वळण; गायब झालेल्या मुलीनेच दिली महत्त्वाची माहिती title=

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : भाजपने (BJP) अमरावती हे लव्ह जिहादचे (Love Jihad) मोठे केंद्र बनत असल्याचा आरोप करत गेल्या 8 दिवसांत अशी पाच प्रकरणे समोर आल्याचा दावा केला होता. अमरावतीमध्ये मंगळवारी पालकांनी त्यांच्या एका 19 वर्षीय युवतींच्या अपहरण केल्याचा आरोप केला होता. यानंतर भाजप नेत्यांसह खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी हे प्रकरण लावून धरलं आहे.

या प्रकरणामध्ये एका युवकाला पोलिसांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या. त्यानंतर राणा यांनी दोन तासांमध्ये मुलीला आणावे असा पोलिसांना अल्टीमेटम दिला होता. मात्र मुलीची कोणतीही माहिती समोर आली नव्हती.

त्यानंतर आता या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. या प्रकरणातील तरुणी घरातून पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. राग आल्याने मुलीचे टोकाचे पाऊल उचललं आणि घरातून पळ काढला, अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी माहिती दिली. यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे.

मी रागातून घरुन निघून गेली असा जबाब तरुणीने सातारा पोलिसांकडे दिला आहे. खासदार नवनीत राणा, भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, खासदार अनिल बोंडे यांनी या संपूर्ण प्रकरणात लव जिहादचा झाल्याचा आरोप केला होता. मात्र तरुणीच्या जबाबाने या सर्वांची हवा निघाली आहे. अमरावतीमधील ही तरुणी रात्री पर्यंत अमरावतीत पोहचणार असल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, गुरुवारी सकाळी पोलिसांनी अमरावतीमधून बेपत्ता झालेल्या तरुणीचा तपास सुरु केला. तरुणीला पोलिसांनी साताऱ्यातून ताब्यात घेतलं. ही तरुणी रेल्वेने एकटी प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.