नुसत्या जाहिराती सुरू आहेत, कर्जमाफी कुठे आहे? : उद्धव ठाकरे

कर्जमाफीबाबत सरकारच्या नुसत्याच मोठ्या जाहिराती सुरु आहेत. कर्जमाफी कुठे आहे, असा सवाल विचारत शेतकही अजूनही कर्जमाफीपासून वंचितच असल्याची टीका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Updated: Nov 12, 2017, 10:52 PM IST
नुसत्या जाहिराती सुरू आहेत, कर्जमाफी कुठे आहे? : उद्धव ठाकरे title=

औरंगाबाद : कर्जमाफीबाबत सरकारच्या नुसत्याच मोठ्या जाहिराती सुरु आहेत. कर्जमाफी कुठे आहे, असा सवाल विचारत शेतकही अजूनही कर्जमाफीपासून वंचितच असल्याची टीका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

... म्हणून संसदेचं अधिवेशन पुढे ढकललं

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते माजी आमदार रायभान जाधव यांच्या जीवनावर आधारीत पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या वेळी आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते. या वेळी बोलताना ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. 'फक्त गुजरात विधानसभा निवडणुकांमुळेच संसदेचं हिवाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं. ही लोकशाही नाही. कोणत्या ना कोणत्या राज्याच्या निवडणुका होतच राहणार. पण देशाची संसद चाललीच पाहिजे अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर केली.

पवारांना न सांगता नाराजी व्यक्त करू

आपल्या आणि शरद पवार भेटीच्या वृत्ताचा समाचार घेताना, सरकारवर आपण नाराज असू तर ते आपण पवारांना न सांगता जाहिरपणे सांगू असा टोलाही ठाकरे या निमित्तानं लगावला. तर, लोकं स्वप्न दाखवतात, गाजर दाखवतात आणि फसवणूक करतात अशी टीकाही उद्धव यांनी भाजपवर केली. गुजरात निवडणुकांमुळे जी एस टी कमी झाला. म्हणून गुजरातला धन्यवाद दिले पाहिजेत असा शालजोडीतला टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.