Jalgaon Honor Killing: जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको येथे प्रेम प्रकरणातून 28 वर्षीय तरुणाचा कोयत्याने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. रविवारी 19 जानेवारीला सकाळी 9 वाजता ही घटना घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी सात मारेकऱ्यांना अटक केली आहे. मुकेश रमेश शिरसाट असं मयत तरुणाचे नाव आहे.
मुकेशने चार ते पाच वर्षांपूर्वी पूजा नावाच्या तरुणीशी प्रेमविवाह केला होता. याचा राग मनात ठेवत गेल्या 4 वर्षांपासून मुलीच्या नातेवाईकांकडून धमक्या आणि त्रास देणं सुरू होतं. रविवारी 19 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता मुकेश शिरसाट आणि मुलीचे नातेवाईक यांच्यात वाद झाला. हा वाद काही वेळाने विकोपाला गेला.
वाद विकोपाला गेल्यानंतर मुलीच्या नातेवाईकांकडील 8 ते 10 जणांनी कोयता व इतर धारदार साहित्यांनी मुकेश शिरसाट याच्यासह त्याच्या नातेवाईकांना वार करून जखमी केले. यामध्ये मुकेश शिरसाटच्या मानेवर गंभीर दुखापत झाली होती. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मुकेशच्या मृत्यूची वार्ता करताच पिंप्राळा हुडकून येथील नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन एकच आक्रोश केला. दरम्यान या घटनेबाबत मुकेशचा नातेवाईक सोनू रमेश शिरसाट याने दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी 2.30 वाजता मारहाण करणारे सतीश जुलाल केदार, प्रकाश शंकर सोनवणे, सुरेश भुताजी बनसोडे, बबलू सुरेश बनसोडे, राहुल शांताराम सोनवणे, पंकज शांताराम सोनवणे, अश्विन सुरवाडे, विकी राजू गांगले, बबल्या राजू गांगले यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा सर्व रा. पिंप्राळा हुडको जळगाव यांच्या विरोधात विविध कलमान्वये रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या खून प्रकरणात पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत एकूण 10 जणांपैकी 7 जणांना ताब्यात घेतलं आहे. तर उर्वरित फरार झालेल्या संशयितांचा शोध घेणे सुरू आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील हे करीत आहे.