अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट, गोळीबार संशयास्पद असल्याचा धक्कादायक अहवाल समोर

Akshay Shinde Death: अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा अहवाल समोर आला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 20, 2025, 02:33 PM IST
अक्षय शिंदे मृत्यूप्रकरणात मोठा ट्विस्ट, गोळीबार संशयास्पद असल्याचा धक्कादायक अहवाल समोर  title=
अक्षय शिंदे मृत्यू संशयात

Akshay Shinde Death: बदलापूर चकमक प्रकरणात मोठा  ट्विस्ट आला आहे.  अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद असल्याचा अहवाल समोर आला आहे. याप्रकरणी 5 पोलीस अधिकार्‍यांविरुद्ध फौजदारी खटला चालणार आहे. मॅजिस्ट्रेटचा अहवाल मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आला आहे. 

पोलीस एन्काऊंटरमध्ये आरोपी अक्षय शिंदेंचा मृत्यू झाला होता, अशी माहिती गृह विभागाने दिली होती. अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि बचावासाठी पोलिसांना गोळी चालवावी लागली असे सांगण्यात येत होते. दरम्यान  बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत, असे फॉरेन्सिक अहवालात म्हटले आहे. 

अक्षयवर गोळीबार केलेला अन्यायकारक आणि संशयास्पद असल्याची टिपण्णी अहवालात करण्यात आली आहे. अक्षयच्या मृत्युला 5 पोलिस अधिकारी जबाबदार आहेत. कायद्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू, अशी माहिती सरकारी वकिलांनी कोर्टात दिली आहे. हा अहवाल हायकोर्टात सादर करण्यात आला.

पीआय  संजय शिंदे, उपनिरीक्षक निलेश मोरे, हरीश तावडे आणि अभिजित मोरे अशी यातील पोलिसांची नावे आहेत.  मृत व्यक्तीशी झालेल्या झटपटीत पाच पोलिसांकडून वापरलेले बळ अनावश्यक होते आणि मृताच्या मृत्यूसाठी हे पाच पोलीस जबाबदार असल्याचे अहवालात म्हटले आहे. दोन आठवड्यांनी याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे. जे प्रश्न या आधी न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केले तेच प्रश्न आज सादर झालेल्या अहवालात  उपस्थित केले गेले आहेत. बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट्स नाहीत असे फॉरेन्सिक अहवालात म्हटले आहे.